भाजप- शिवसेनेचे आमदार विधानसभेत भिडले; एकमेकांना धक्काबुक्की


वेब टीम : नागपूर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस गाजला तो आमदारांच्या धक्काबुक्कीच्या घटनेने. विधानसभेत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात ही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गायकवाड यांनी घडलेल्या प्रकाराचे वर्णन गोंधळ असे केले आहे. या सर्व गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभेत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने आक्रमक होत आपल्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांना प्रत्येकी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. काही वेळाने गोंधळ वाढत गेला.

त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमा होत त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी भाजप आमदार अभिमन्यु पवार यांच्या हातात बॅनर होता.

या बॅनरवर अध्यक्षांनी आक्षेप घेतला. सभागृहात बॅनर फडकावल्यास कारवाई करेन असे अध्यक्षांनी बजावले. मात्र पवार हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हे पाहून आपण तिथे जात पवार यांच्या हातातील ते बॅनर काढून घेण्याचा प्रयत्न केला, असे गायकवाड यांनी सांगितले.

सभागृहात दोन आमदारांमध्ये संघर्ष उभा राहिल्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनी आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. भाजपकडूनही आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांनी भाजप आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post