'या' कारणामुळे शिवसेनेने दिला नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा


वेब टीम : मुंबई
नागरिकत्व सुधारणा विधेयक ९ डिसेंबरला रात्री उशिरा लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने ३११ मते पडली. तर ८० मते ही विधेयकाच्या विरोधात पडली. विशेष म्हणजे या विधेयकाला आधी विरोध करणाऱ्या शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले.

यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरून ते असल्याने शिवसेनेने याला पाठिंबा दिला आहे.” असे स्पष्टीकरण सावंत यांनी दिले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सावंत म्हणाले की, “राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. तो राज्याच्या मुद्द्यांवर तयार केला आहे. “किमान समान कार्यक्रमासाठी आम्ही यूपीएमध्ये गेलेलो नाही. त्यामुळे नागरिकत्व विधेयकाला विरोध करण्याचं आमच्यावर बंधन नव्हतं.

येत्या काळात याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करू.” असे सावंत यावेळी म्हणाले. दरम्यान, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याचे त्यांनी स्वागत केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post