'हा' युवा, आक्रमक नेता होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष?


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अर्थमंत्री झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नेमणूक होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या नावांची चर्चा रंगली आहे.

यातच राष्ट्रवादीचे युवा आणि आक्रमक नेते शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात येणार? अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन वाद पेटला. यातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजभळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामुळे जयंत पाटील यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवण्यात येणार, अशा चर्चांनी उधाण आले होते.

यातच राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह धनंजय मुंडे यांचेही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे चित्र होते.

मंत्रिपदासाठी इच्छुक असेलल्या धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार नक्की कुणाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post