स्मिथला मागे टाकत विराट कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी


वेब टीम : कोलकाता
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकत ९२८ गुणांसह तो प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात त्याने झळकावलेल्या शतकामुळे क्रमवारीत सुधारणा झाली.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली ९२८ गुणांसह पहिल्या तर स्टीव्ह स्मिथ ९२३ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

न्यूझीलँडचा कर्णधार केन विल्यमसन व भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा अनुक्रमे आपल्या तिसऱ्या व चौथ्या स्थानावर कायम आहेत.

पाकिस्तानविरुद्ध नाबाद त्रिशतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने १२ स्थानांची झेप घेत पाचवे स्थान पटकावले आहे. भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणे सहाव्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट ४ क्रमांकांची झेप घेत सातव्या तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ६ क्रमांकाची झेप घेत आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. किवी फलंदाज हेन्री निकोल्स नवव्या व श्रीलंकन दिमुथ करुणारत्ने दहाव्या स्थानावर आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post