राज्यात थंडीचा कडाका वाढला; अतिथंड वाऱ्याचा जोर


वेब टीम : पुणे
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे अतिथंड वार्‍याचे प्रवाह वाहत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात हवेत गारवा वाढला आहे.

सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने राज्यात ठिकठिकाणी धुक्याचे प्रमाण वाढले आहे. थंड वार्‍यामुळे हवेतील गारवा आणखी काही दिवस टिकून राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा गारठा वाढला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणचे किमान तपमान 16 ते 20 अंशांदरम्यान नोंदविले जात होते. मात्र काल किमान तपमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी कमी नोंदविले गेले.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागातील किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून, विदर्भातील किमान तपमानात किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.

नांदेड येथे 11.5 अंश सेल्सिअस एवढे राज्यातील नीचांकी किमान तपमान नोंदविले गेले. तर पुणे 13.9, नाशिक 13.4, नगर 14.3, जळगाव 14.4, महाबळेश्वर 14.2, सातारा 14.4, औरंगाबाद 14.3 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली. किमान तपमान घटल्याने इथे थंडी वाढली आहे.

दरम्यान, पुढील आठवड्याच्या सुरुवातीला मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुन्हा ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागने व्यक्त केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post