वेब टीम : मुंबई शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याच...
वेब टीम : मुंबई
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असा टोला लगावला.
उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असे नाव करावे असे म्हटले होते. संजय राऊत यांनी आज उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिले.
“उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
“आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचे नाव जिथे येते तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचे काम पुढे नेले असल्याचे ते यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी शरद पवार जाणते राजे असल्याचे सांगत उदयनराजेंच्या टीकेचा समाचार घेतला.“शरद पवार जाणते राजे आहेतच. त्यांना जनतेने ही उपाधी दिली. शिवसेना प्रमुख स्वत: म्हणाले नाहीत की, आपण हिंदूह्रदयसम्राट आहोत.
शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, लोकांनी त्यांना राजा मानले. महाराष्ट्रात देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस जनतेचा राजा आहे.आम्हीही शरद पवारांना तो मान देतो,” असे उत्तर यावेळी त्यांनी दिले.
COMMENTS