छत्रपतींसाठी जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला : शरद पवार

file photo

वेब टीम : सातारा
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा नीट अभ्यास केला तर महाराजांची उपाधी ’शिवछत्रपती’ ही होती, ’जाणता राजा’ अशी कधीच नव्हती! ’जाणता राजा’ हे बिरुद रामदास स्वामींनी शिवरायांना दिले.

रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, तर त्यांच्या गुरू राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांचे व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर दिले.

शरद पवार यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख करण्यावर छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे यांनी आक्षेप घेतला होता. यावर पवार यांनी ’मला जाणता राजा म्हणा‘ असे आपण कधीच म्हणालो नाही, असे सांगितले.

पडळ (ता. खटाव) येथील खटाव-माण साखर कारखान्याच्या 2 लाख 51 हजार 1 व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीपराव येळगावकर, प्रभाकर देशमुख, डॉ. तानाजीराव चोरगे, सतीश सावंत, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, जि. प. अध्यक्ष उदय काबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सुरेंद्र गुडगे, प्रा. बंडा गोडसे, नंदकुमार मोरे, विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात त्यांना जाणता राजा असे कुठेही संबोधण्यात आलेले नाही. ‘जाणता राजा’ हा शब्द रामदास स्वामींनी आणला. महाराजांचे गुरू रामदास स्वामी होते, ही लेखणीची कमाल आहे, असेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post