file photo वेब टीम : दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिर निर्मितीबाबत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. अयोध...
file photo |
वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिर निर्मितीबाबत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
भारताच्या ऑक्सिजनमध्ये, आदर्शांमध्ये आणि मर्यांदांमध्ये भगवान श्रीराम आहेत, तसेच अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिर उभारणीच्या कामाबाबत निर्णय घेण्यास स्वायत्त असेल, असे पंतप्रधान म्हणाले. सखोल विचार करून, तसेच चर्चेअंती 5 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याची विनंतीही उत्तर प्रदेश सरकारला करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली.
भारतात राहणारे हिंदू असोत, मुस्लीम असोत, शीख, ईसाई, बौद्ध, पारसी किंवा मग जैन असोत, हे सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत, असे मोदी म्हणाले. या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याचा विकास व्हावा, ते सुखी राहावेत, देशाचा विकास व्हावा याच भावनेने माझे सरकार ’सबका साथ, सबका विश्वास’ या मंत्रावर चालत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
COMMENTS