अहमदनगर : जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला


वेब टीम : अहमदनगर
चीनमधून नगर जिल्ह्यात आलेल्या एकूण 29 नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. या नागरिकांना कोणत्याही आजाराची लागण झालेली नसल्याचे आढळून आले. त्यांची प्रकृतीदेखील ठणठणीत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सुपा एमआयडीसीत कामाला असलेल्या नेवासा तालुक्यातील एका युवकाला जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे.

हा तरुण 15 दिवसांपूर्वी चीन मधून परतला आहे. त्यास खोकल्याचा त्रास झाल्याने तो श्रीरामपूरला रुग्णालयात गेला होता. त्यास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचे रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.

चीनमधील वुहान प्रांतात करोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. हा आजार चीनबरोबरच अन्य देशांतही फैलावला आहे. भारत देशातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपायोजना सुरू केल्या आहेत. चीनमधून येणार्‍या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत, त्यानुसार राज्यात सर्वत्र चीनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.

नगर जिल्ह्यात चीनमधून काही नागरिक आले आहेत. कंपनीच्या कामासाठी हे नागरिक चीनमध्ये गेले होते, ते आता परतले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या नागरिकांशी संपर्क साधून त्यांची आरोग्य तपासणी केली आहे. परंतु, या नागरिकांमध्ये कोणत्याही आजाराचे लक्षण आढळलेले नाही. शिवाय, या नागरिकांना येऊन चौदा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे.

या नागरिकांची प्रकृती ठणठणीत आहे, त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाकडून या नागरिकांशी काही दिवस नियमित संपर्क साधला जाणार आहे. हे नागरिक चीनमधून आलेले असले तरी वुहान शहरातून आलेले नाहीत, चीन देशातील अन्य भागातून आले आहेत, असेही जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post