करोना व्हायरसवर अमेरिकेची चीनला मदत


वेब टीम : दिल्ली
हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया बंदरात आलेल्या वर्ल्ड ड्रीम या पर्यटनपर जहाजाला (क्रूझ) सध्या वेगळे ठेवण्यात आले आहे. या जहाजावर 1800 प्रवासी असून त्यापैकी काहींना करोनाबाधा झाल्याचा संशय आहे.

वेगाने पसरणार्‍या करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने चीन व इतर प्रभावित देशांना 10 कोटी डॉलर इतकी मदत देऊ केली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेतील खासगी क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत. त्याशिवाय आम्ही 10 कोटी डॉलरची मदत देणार आहोत. उर्वरित जगानेही या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करावी. अमेरिका ही मदत थेट देईल किंवा बहुदेशीय संघटनांच्या मार्फत देईल. अमेरिकी सरकारने ठेवलेल्या संकीर्ण निधीतून ही मदत दिली जाणार आहे.

अमेरिकेने परदेशी नागरिकांना चीनमध्ये प्रवासावर बंदी घालून घबराट निर्माण केली आहे अशी टीका चीनने केली होती, तरीही अमेरिकेने ही मदत देऊ केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने आतापर्यंत करोना विषाणूची समस्या ज्या प्रकारे हाताळली त्याची प्रशंसा केली आहे. चीनचा प्रतिसाद हा अतिशय व्यावसायिक होता, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी दूरध्वनीवर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी याबाबत चर्चा केली.

पॉम्पिओ यांनी सांगितले की, अमेरिकेने 17.8 लाख टन वैद्यकीय सामग्री चीनला पाठवली आहे. त्यात मास्क, गाऊन, गॉझ (कापूस), श्वासोच्छवास यंत्रे यांचा समावेश आहे. आतापर्यंत 12 देशातील 31 हजार लोकांना विषाणूची लागण झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post