फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत अपहार उघड; गुन्हा दाखल


वेब टीम : अहमदनगर
पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेचे काम मंजूर झाल्यानंतर जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने बँकेत खाते उघडून त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार करण्यात आला.

या प्रकरणी नगर तालुक्यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतचे तत्कालीन उपसरपंच आणि ग्रामसेवकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जऱ्हाट असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी आशिमा मित्तल यांची दिलेल्या आदेशानुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम तुपे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१ जानेवारी २०१६ ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीत मजले चिंचोली ग्रामपंचायतचे उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जऱ्हाट यांनी संगनमताने जेऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने संयुक्त खाते उघडले. 

त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार केला. तसेच पाणी पट्टी वसुलीचे बेकायदेशीर खाते उघडून त्यातूनही १ लाख ५८ हजार ५३० रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी केली असता अपहार झाल्याचे उघडकीस आल्याने ही फिर्याद देण्यात आली आहे.

या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात धर्मनाथ आव्हाड व श्रीकांत जऱ्हाट यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४६८,४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधोर हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post