मुख्यमंत्र्यांचा मार्ग होणार सुकर; विधानपरिषद बिनविरोध करण्याचे प्रयत्न


वेब टीम : मुंबई
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट होऊ लागले आहे.

त्यांच्यासह विधान परिषदेच्या इतर आठ जागांवर देखील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपा चार जागा लढवण्यावर ठाम आहे.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी गेल्या महिन्यात २४ एप्रिल रोजी मतदान होणार होते.

मात्र कोरोनाच्या महामारीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

आता निवडणूक आयोगाने येत्या २१ मे रोजी ही निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.

राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

त्यामध्ये एकूण २८८ सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे.

या नऊ जागांसाठी बिनविरोध निवडणूक न झाल्यास या सर्व २८८ सदस्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून बाहेर पडून मुंबईला यावे लागणार आहे.

लॉकडाऊनची मुदत १७ मेनंतरही जर वाढवली गेली तर या आमदारांना मुंबईत येणे कठीण होऊन बसणार आहे.

हा पेच टाळण्यासाठी या सर्व नऊ जागांवर पक्षीय बलाबलानुसार उमेदवारांची बिनविरोध निवड व्हावी, असे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

विधान परिषदेच्या या निवडणुका टाळण्यासाठी सर्व पक्षांमध्ये एकमत होणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे या नेत्याने सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post