#मिशनबिगिनअगेन : महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने निर्बंध होणार शिथिल


वेब टीम : मुंबई
पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत, एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतू ही वाट अत्यंत निसरडी आहे. ती चालतांना आपल्या सर्वांना एकमेकांचे हात हातात धरून अतिशय जबाबदारी आणि खबरदारीने पुढे जायचे आहे. एकदा सुरु केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, त्यासाठी स्वंयशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवत वाटचाल करतांना देशापुढे महाराष्ट्राचा आदर्श प्रस्थापित करावयाचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल करतांना ३,५ आणि ८ जूनच्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या बाबींना शिथिलता देण्यात आली आहे, याची माहिती यावेळी दिली.   येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळ धडकण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचेही आवाहन केले, तसेच शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतची माहितीही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.

पहिल्या टप्प्यात ३ जूनपासून खासगी आणि सार्वजनिक मैदानांवर,  समुद्र किनाऱ्यांवर सायकलिंग, जॉगिंग आणि धावणे-चालणे या गोष्टींला मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत कोणत्याही सामूहिक कृतीला मान्यता नाही. ५ जूनपासून दुकाने आणि ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी असलेली खासगी कार्यालये उघडली जातील अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, आपल्याला कुठेही गर्दी करून सुरु झालेल्या गोष्टी बंद करावयाच्या नाहीत. याची काळजी प्रत्येकाने घेऊनच घराबाहेर पडायचे आहे, स्वच्छता आणि स्वयशिस्त पाळायची आहे. मास्क वापरणे , चेहऱ्याला हात न लावणे, शारीरिक अंतर ठेवणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता लक्षात  घेऊन सिंधुदूर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांनी काळजी घेण्याचे, समुद्रात न जाण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हे वादळ येण्याची शक्यता असून  ते दिशाही बदलू शकते परंतू तरीही त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post