वेब टीम : नाशिक येणाऱ्या काळात कृषीमालाची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असून कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ती अधिक तीव्रतेने जाणवणार...
वेब टीम : नाशिक
येणाऱ्या काळात कृषीमालाची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असून कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ती अधिक तीव्रतेने जाणवणार आहे, त्यामुळे २०२० वर्ष हे कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने केला आहे.
तसेच खते, बियाणे व त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारे पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडलेल्या खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठकीत ना.भुसे बोलत होते.
यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम बलसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, कृषी विभागाचे उपविभागस्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
भुसे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जगाबरोबरच शेतकरीही अडचणीत सापडलेला आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्याने पिकवलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग जिल्ह्यासोबतच राज्यभर सक्रिय आहे.
कृषी उत्पादनांच्या बाबतीत शेतकरी व राज्य जास्तीत जास्त पुढे राहील या दृष्टीकोनातून २०२० वर्ष हे कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करणार आहोत.
तसेच कृषी उत्पादनाची साठवणूक, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने त्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे काम सुरु आहे.
गटशेती व फार्मास्युटिकल कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.