'मां' मला येऊ दे ना..!


ज सकाळी-सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, अन् मन सुन्न झालं. चौथी मुलगी झाली म्हणून तिचा खून करुन तिला गावाबाहेर पुरुन टाकलं. नुकतंच जन्मलेलं बाळ.. पोटभर आईचं दूधही प्यालं नसेल ना...!! पण मातीच्या आड होताना त्या लहानग्या जीवाला काय यातना झाल्या असतील ?

सन २०१२  मध्ये राजस्थानमध्ये मुली मिळत नाहीत म्हणून एका मुलीचं लग्नं चार भावांशी लावण्यात आलं. त्या मुलीला महाराष्ट्रातील एका खेड्यातून पळवून आणली होती. सतत होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून त्या मुलीने हिकमतीने सुटका करुन घेतली आणि पोलिस स्टेशनला गेली.. तिने तिच्या परिस्थितीबद्दल जगाला सांगितले तेव्हा सारा देश सुन्न झाला होता. राजस्थानमध्ये मुलगी झाली की तळघरात नेऊन दूधात बुडवून ते लोक मुलींना मारुन टाकतात.. 

मी 'आई मला येऊ दे ना' ही एकांकिका आकाशवाणीवर व खेड्यातून सादर केली होती. गेले २२ वर्ष मी यावर काम करतेय. लेखन, व्याख्याने, पोस्टर अभियान, शोधनिबंध हे करतेय. पण अजूनही अशा बातम्या वाचनात आल्या की सुन्न होतं. असो. 'मुलगी का नको 'याचा कारणमिमांसा करणारा शोधनिबंध लिहिताना माझ्यासमोर समाजाचे अत्यंत हिडीस रुप दिसले. यात सुशिक्षित आणि अशिक्षित दोन्हीही लोक होते.

मुलगी परक्याचे धन आहे. इस्टेटीवर आमच्या पश्चात दुसऱ्यांचे नांव लागणार. मुलाने अग्नि दिला की म्हणे स्वर्गप्राप्ती होते. मोक्ष मिळतो 😡 आम्ही वर्षानुवर्षे पुरषी जाच सहन करतोय. मग आमच्या मुलींनी का सहन करावं? त्यापेक्षा मुलगी नकोच. का तर मला शिकता आलं नाही मनाप्रमाणे, मुलीला तरी मिळेल का? मुलगा असेल तर म्हातारपणी सांभाळेल. मुलींवर आपले काय हक्क? असली कारणं स्त्री व पुरुष दोघांनीही माझ्यासमोर टाकली. काही तर हास्यास्पद वाटली. पण काही खरीच आहेत. 

अजूनही समाजात मुलीच घर मुलीचे आईवडिल परकचं मानतात. जर फक्त मुलीचं असतील तर आईवडिलांच्या जबाबदारीची भिती मुलाकडच्या लोकांना वाटत असते. मुलाच्या आईने सुनेला चार समजूतीच्या गोष्टी सांगितल्या तर चालतात. पण जावयाला सासुने कांही सांगितले तर ती मुलीच्या संसारात ढवळाढवळ होते. ही वैचारिक दरिद्रता पिढ्यानपिढ्या आपल्या मनात ठाम बसवलीय.

मुलगामुलगी बरोबरीचे आहेत. जेवढे कष्ट,खर्च मुलांच्या आईवडिलांना मुलाला वाढवताना होतात, तेवढेच कष्ट खर्च मुलीला वाढवताना शिकवताना मुलींच्या आईवडिलांना होत असतो. मुलीच्या आईवडिलांनी मुलाकडच्या प्रतिष्ठेप्रमाणे खर्च करुन लग्नही करुन द्यायचं असतं. साखरपुडा, पहिलं बाळंतपण हेही मुलीच्या आईवडिलांकडून झालं पाहिजे, असा समाजाचा जणू दंडकच असतो.
ही मानसिकता संपल्याशिवाय कुणालाच मुलगी हवीहवीशी वाटणार नाही. मुलींना माणूस समजा. बरोबरीने वाढवा, वागवा हे सांगून आयुष्य संपत आली... पण फरक पडत नाहीत. हातावर मोजता येण्याजोग्या घरात ही समता आता आता जन्म घेतेय. चित्र बदलेल... नवी सकाळ उजाडेलही.. मला मात्र ती गडहिंग्लजमधील
चिमुकली हाका मारताना ऐकू येतेय "मां,  मला येऊ दे ना..! मां मला येऊ दे ना..!!! 😢😢

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post