अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात पूर्वमोसमी पाऊस लावणार हजेरी


वेब टीम : पुणे
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याने ते केरळच्या दिशेने गतिमान झाले आहेत. 

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने आजपासून कोकण विभागासह राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अंदमान समुद्रामध्ये १७ मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांचा प्रवास दहा दिवस थांबला होता. 

त्यानंतर बंगालच्या उपसागरातून पोषक स्थिती निर्माण झाल्याने मोसमी वाऱ्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. 

अरबी समुद्र ते केरळ आणि लक्षद्विप ते केरळची किनारपट्टी या भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे मोसमी वाऱ्यांना चालना मिळून त्यांनी अरबी समुद्रातील वाटचाल सुरू केली आहे. 

ही स्थिती लक्षात घेता मोसमी पाऊस १ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याचे वातावरण निर्माण झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

येत्या ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. 

त्यामुळेही मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला गती मिळणार आहे. कमी दाबाचा हा पट्टा तीव्र होण्याची शक्यता आहे. 

परिणामी कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

३ जूनपर्यंत राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post