देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका; चिनी वस्तूंच्या खरेदीचा पैसा भारतीय सैन्याविरोधात...


वेब टीम : दिल्ली
भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी केले आहे.

वांगचुक यांनी याबाबत युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

त्यात ते म्हणतात की, भारतीय खूप मोठ्या प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात.

एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळुरू व देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला ‘पाकिटा’तून म्हणजेच पैशाच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे.

सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे वांगचुक यांनी लेह-लडाखमधील एका निर्जन ठिकाणी बसून विस्तृत विश्लेषण केले आहे.

वांगचुक म्हणतात की, कोरोनामुळे चीनचे आर्थिक कंबरडे मोडले असून आता चीन पुन्हा उभा राहण्यासाठी धडपडतो आहे.

चीनचा जीडीपी मोठ्या प्रमाणात घसरला आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे.

त्यामुळे तेथील जनतेमध्ये असंतोष आहे.

या असंतोषाचा सरकारविरुद्ध उद्रेक होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांशी काही ना काही खुसपटं काढून चिनी लोकांचे लक्ष मूळ प्रश्नावरून इतरत्र वळवतो आहे.

चीनमधील नागरिकांमधील देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि तेथील आर्थिक परिस्थितीमुळे उद्रेक होऊन राज्यकर्त्यांविरोधात रोष निर्माण होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांबरोबर काही ना काही कारणांवरून संघर्षाची परिस्थिती निर्माण करू पाहात आहे.

आज चीनमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. मात्र तेथील राजकीय परिस्थितीमुळे देशातील १४० कोटी जनता सरकारच्या दबावाखाली काम करते आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये केवळ भारतीय जवानांनी गोळ्यांनी उत्तर देऊन भागणार नाही तर सर्वसामान्य माणसांनीही चीनला उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे वांगचुक म्हणतात.

भारत चीनमधून दरवर्षी ५.२ लाख कोटींचे सामान आयात करतो आणि निर्यात आहे १.२ लाख कोटी.

म्हणजे आयात आणि निर्यातीमध्ये ४.२ लाख कोटींची तफावत आहे.

भारताचा हाच पैसा चीनमध्ये जाऊन बंदूक आणि हत्यारांच्या माध्यमातून आपल्या जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो.

म्हणून आपल्या देशातील १३० कोटी जनता आणि परदेशातील तीन कोटी भारतीयांनी एकत्र येऊन देशात आणि जगभरामध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केल्यास त्याला जगभरातून प्रतिसाद मिळू शकतो.

आज जगभरामध्ये चीनविरोधी वातावरण आहे. जगभरामधून चिनी सामानावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली तर चीनची भीती सत्यात उतरेल आणि तेथील अर्थव्यवस्था कोसळेल.

सामान्य लोक रस्त्यावर येऊन विरोध नोंदवतील आणि त्यातून चीनमध्ये सत्तांतर होईल.

असे झाले नाही तर ती दुर्दैवाची गोष्ट असेल; कारण एकीकडे आपले सैनिक चीनविरोधात सीमेवर लढत असतील तर दुसरीकडे भारतीय नागरिक मोबाईलपासून ते लॅपटॉपर्यंत आणि कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत गोष्टींचा वापर करून चीनच्या सैन्याला पैसा पुरवत असतील, असं वांगचुक म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post