कोरोनाची घरोघरी जाऊन तपासणी करा; भुजबळ


वेब टीम : नाशिक
राज्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या बघता तपासणी पथके करून तातडीने डोअर टू डोअर स्क्रिनिंग करण्यात यावे.

सर्वे करताना केवळ मलमपट्टी नको तर, तपासणीतून प्रत्यक्ष निष्कर्ष द्या अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा,

असे आदेश मंत्री  छगन भुजबळ यांनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

येवल्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत लोक आपल्यापर्यंत येण्याअगोदरच त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात यावी.

तपासणीची संख्या वाढविण्यात यावी. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण, पुरेसे सॅनीटायझर, हॅण्ड ग्लोजसह आवश्यक साहित्याचा पुरवठा करावा.

लो रिस्क आणि हाय रिस्क रुग्णांचे अहवाल येईपर्यंत त्यांना होम कॉरंटाईन करण्याऐवजी त्यांना इन्स्टिट्युशनमध्ये कॉरंटाईन करण्यात यावे इत्यादी सूचना यावेळी देण्यात आल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील स्वच्छता तसेच आवश्यक औषध फवारणी करण्यात यावी असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले.

समन्वय आणि नियोजनाचा अभाव होता कामा नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामकाजात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.

शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुकानांना वेळ वाढून द्यावी तसेच यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्याचबरोबर शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच मका खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करण्यात यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post