अहमदनगर : भूसंपादन कार्यालयालाच ठोकले टाळे...


वेब टीम : अहमदनगर
जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात असलेल्या भूसंपादन विभागाच्या सहा कार्यालयांना मंगळवारी (दि.16) सकाळी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने टाळे ठोकण्यात आले आहे.

या कार्यालयांकडून वारंवार सूचना देवूनही भाडे न मिळाल्यामुळे क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी ही कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेली भूसंपादन विभागाची कार्यालये यापुर्वी शासकीय विश्रामगृहाच्या मागील बाजुस होती.

या जागेवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर सहा वर्षापासून येथील भूसंपादन विभागाची सहा कार्यालये जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात स्थलांतरित करण्यात आली होती.

तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या कार्यकाळात या कार्यालयांचे स्थलांतर झाले होते. तेव्हापासून समन्वयक भूसंपादन अधिकारी कार्यालयासह इतर पाच भूसंपादन अधिकारी कार्यालये या जागेत कार्यरत आहेत.

सदर कार्यालयांच्या इमारतीचे भाडे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास देणे आवश्यक होते. मात्र, ते दिले गेले नाही.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पदभार कविता नावंदे यांनी घेतल्यानंतर त्यांनी क्रीडा संकुलात विविध उपाययोजना केल्या.

तसेच विविध कार्यालयांची माहिती घेतली असता भूसंपादन विभागाच्या कार्यालयांचे भाडे मिळत नसल्याची बाब समोर आली.

त्यानंतर त्यांनी या कार्यालयांना वारंवार सूचना केल्या. परंतु, कुठलीही दखल घेतली न गेल्याने त्यांनी 15 दिवसांपुर्वी जागा खाली करण्यासंदर्भात अंतीम नोटीस दिली होती.

तरीही भूसंपादन विभागाकडून भाडे न मिळाल्याने क्रीडा अधिकारी नावंदे यांनी मंगळवारी (दि.16) सकाळी या कार्यालयांना टाळे ठोकले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post