रोहित पवारांचा अभ्यास कच्चा... त्यांना कॅल्क्युलेशन समजत नाही...वेब टीम : सातारा

भाजपनं घाईघाईनं एलबीटी रद्द केल्यामुळं राज्याचं नुकसान झालं असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला हाणला आहे. 


'रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे,' असं फडणवीस म्हणाले.


सातारा जिल्ह्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या जीएसटीच्या परताव्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 


अलीकडेच झालेल्या एका बैठकीत अजित पवारांनी जीएसटीवरून केंद्र सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 


त्यानंतर रोहित पवारांनीही भाजपवर टीका केली होती. 


'भाजपवाल्यांना खरंच महाराष्ट्रातील जनतेबद्दल कळवळा असता तर केंद्राकडे अडकलेले जीएसटीचे पैसे त्यांनी मागितले असते, असं रोहित पवार म्हणाले होते. 


फडणवीसांनी या सर्व टीकेला सविस्तर उत्तर दिलं.'जीएसटी संबंधीच्या बैठकीत अजित पवार काय बोलले आणि त्यातून अर्थ काय काढले गेले यात फरक आहे. 


मी त्यासाठी अजितदादांना दोष देणार नाही. पण केंद्र जीएसटीचे पैसे देत नाही अशी ओरड सातत्यानं केली जातेय. खोटं बोल पण रेटून बोल अशी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. 


खरंतर, केंद्र सरकारने राज्यांना देणे असलेले मागील वर्षीचे म्हणजेच, मार्च २०२० पर्यंतचे १९,५०० रुपये आधीच दिले आहेत. 


साथ रोग कायद्याच्या नावाखाली केंद्र सरकार ते नाकारूही शकलं असतं. पण केंद्राने तसं केलेलं नाही. 


आताची जी मागणी होतेय, ती मार्चनंतरच्या जीएसटीची आहे. त्याबाबतही केंद्रानं मदतीची भूमिका घेतलीय,' असं फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post