मुंडे, तावडेंना मानाचे स्थान... एकनाथ खडसेंना भाजपने टाकले वाळीत...?वेब टीम : मुंबई

भारतीय जनता पक्षानं आज आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. महाराष्ट्रातून नाराज नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळं भाजपनं खडसेंना पुन्हा एकदा वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. 


पण खडसे आणखी वेट करणार की वेगळा निर्णय घेणार, या चर्चेला आता उधाण आलं आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. 


त्यात राज्या-राज्यातील नाराज नेत्यांना सामावून घेतल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातून पंकजा मुंडे व तावडे यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर सतत टीकेच्या तोफा डागणारे एकनाथ खडसे यांना डावलण्यात आलं आहे.


भूखंड घोटाळ्यात मंत्रिपद गेल्यानंतर खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. त्याबद्दल ते सातत्यानं नाराजी व्यक्त करत होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही नाकारण्यात आलं. 


त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं. खडसे यांना स्वत:ला तिकीट हवं होतं. मात्र, पक्षानं ऐकलं नाही. निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यानं ते आणखीच संतापले होते. 


विधान परिषदेवर त्यांना पाठवलं जाईल अशी चर्चा होती. तीही हवेतच विरली. त्यानंतर आता राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांना संधी नाकारण्यात आली आहे.मागील काही दिवसांत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप त्यांना भोवले असल्याचे बोलले जाते. 


फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला, असा आरोप त्यांनी केला होता. राज्यातील भाजपची सत्ता जाण्यास फडणवीसच जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली होती. 


गेल्या काही दिवसापासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचीही चर्चा सुरू होती. या साऱ्याचा फटका त्यांना बसला आहे. मुंडे व तावडे यांचा समावेश करून पक्षानं खडसेंना स्पष्ट संदेशच दिल्याची चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post