ठाकरे आणि पवार म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे 'ब्रँड' : संजय राऊतवेब टीम : मुंबई

अभिनेत्री कंगना रनौत यांनी मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत आहे असे विवादित विधान केले होते. 


त्यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून, शिवसेनेकडून त्यांच्यावर सतत प्रहार केला जात आहे. 


आणि याच मुद्द्यावर आजही शिवसेनेचे खासदार संजय राऊत याची आजच्या सामनातील रोखठोक या सदरात कंगनासह भाजपाला लक्ष्य केले आहे.


मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. 


मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? 


महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


आजचा सामनातील रोखठोक…

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे. मुंबईविरोधात 60-65 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला. भाजपचे एक प्रमुख नेते श्री. आशीष शेलार (Ashish Shelar) यांचे असे म्हणणे आहे की, ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत कशी?’ भाजप नेत्यांचा इतिहास कच्चा आहे. श्री. मोरारजी देसाई त्या वेळी मुख्यमंत्री होते. गोळीबाराचे आदेश त्यांचेच होते. देसाई यांच्या आदेशाने जशी मुंबईत मराठी माणसे शहीद झाली तशी गुजरातमध्येही 16 गुजराती बांधव शहीद झाले. आता इतिहास असे सांगतो की, हेच मोरारजी देसाई पुढे काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतःची वेगळी काँग्रेस काढली. हेच देसाई पुढे देशाचे पंतप्रधान झाले व त्यांच्या मंत्रिमंडळात श्री. अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण आडवाणींपर्यंत सर्व जनसंघीय दिग्गज सामील झालेच होते. खरे तर हा इतिहास आता खरवडून कशासाठी काढायचा? प्रत्येक इतिहासाला एक काळी बाजू असतेच. काँग्रेसने म्हणजे मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला त्याच्या निषेधार्थ केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख हेसुद्धा तेव्हा काँग्रेसवालेच होते व महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सक्रिय समर्थक होते.


कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरुंगाच्या दारात रांग लावणारा ‘मरगट्टा’ आज निप्रभ झाला काय? भारतीय जनता पक्ष त्यांच्या राष्ट्रीय धोरणानुसार भूमिका घेत आहे. अशीच राष्ट्रीय भूमिका पूर्वी काँग्रेस घेत असे हे विसरता येणार नाही. आज पुन्हा मराठी माणसाचे आणि अस्मितेचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत. पु. रा. बेहेरे यांनी एकदा म्हटले आहे, ‘मुंबईला निसर्गानेच महाराष्ट्राच्या बाहुपाशात ठेवले आहे. भूगोलानेच तिला महाराष्ट्राच्या अंगावर बसविले आहे.’ हा भूगोल बिघडवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले तेव्हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे ‘जंतर मंतर’ प्रयोग सुरू झाले. ते आजही सुरूच आहेत.मुंबईतून ‘लॉक डाऊन’ काळात लाखो मजूर आपापल्या राज्यांत परत गेले. त्यातले बहुसंख्य मजूर पुन्हा मुंबईत परत आले. मुंबई त्यांच्यासाठी रोजीरोटी देणारे शहर आहे. या शहराबाबत हा श्रमिक वर्ग कृतज्ञ आहे. मुंबई त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित शहर आहे. मुंबईच्या जडणघडणीत श्रमिकांचे योगदान मोठे आहे. मुंबई मूळची कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी, पाठारे प्रभू वगैरे समाजाची असेल. म्हणजेच मराठी माणसाची असेल; पण तिला धनकनक संपन्न आम्हीच केले, ही घमेंड, अहंकार मुंबईतील शेठ लोकांत तेव्हाही होता, आजदेखील आहेच. हीच घमेंड उतरवण्याचे काम सर्वांत आधी शिवसेनेने केले. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात दिल्लीच्या मनात कायम द्वेषभावना राहिली. जो शिवसेनेविरोधात बोलेल तो दिल्लीश्वरांची ‘लाडकी डार्लिंग’ होत असते. राजस्थानातील महाराणा प्रतापाचे वंशज व महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मर्‍हाठा’ वंशज यांच्या शौर्याच्या आणि स्वाभिमानाच्या बाबतीत कधीच शौर्य न गाजवलेल्या सध्याच्या राजकीय पिढीने नेहमीच आकस ठेवला हे आताही दिसत आहे.


मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्य़ांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा. ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल.


एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषेत बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राममंदिरच होते, असा कांगावा तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करून ती सांगत असलेल्या ‘पाकिस्ताना’त बांधले. मुंबईला पाकिस्तान बोलायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिकल स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठय़ा कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. मुंबईने प्रत्येकाला दिले आहे. पण मुंबईबाबत कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांना यातना होतात. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबाडण्यासाठी व पैसे कमवण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळय़ांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे! असे म्हणत त्यांनी भाजपलाही लक्ष्य केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post