अहमदनगर (प्रतिनिधी)- लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या हिंसाचारात हुतात्मा झालेल्या शेतकर्यांच्या अस्थि घेऊन देशभर सुरु असलेली शहीद अस्थिकलश यात...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या हिंसाचारात हुतात्मा झालेल्या शेतकर्यांच्या अस्थि घेऊन देशभर सुरु असलेली शहीद अस्थिकलश यात्रा शहरात शनिवारी (दि.13 नोव्हेंबर) दुपारी दाखल झाली. या अस्थिकलशचे हुतात्मा स्मारक येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, सिटू, आम आदमी पार्टी, जनआंदोलनाची संघर्ष समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तर हिंसेचा धिक्कार करीत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या 650 हून अधिक शेतकर्यांनाही आदरांजली वाहण्यात आली.
भाजप वगळता सर्व पक्ष, सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांनी शहरात ठिकठिकाणी शहीद अस्थिकलशला अभिवादन केले. हुतात्मा स्मारक येथे किसान सभेचे राज्य सचिव कॉ. नामदेवराव गावडे यांच्या हस्ते अस्थिकलशला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड. कॉ.सुभाष लांडे, अॅड. कॉ.सुधीर टोकेकर, कॉ.बन्सी सातपुते, कॉ. बाबा आरगडे, माजी नगरसेवक संजय झिंजे, कॉ. महेबुब सय्यद, बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, सतीश पवार, गंगाधर त्र्यंबके, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, कॉ. भारती न्यालपेल्ली, संध्या मेढे, कॉ. अनंत लोखंडे, यशवंत तोडमल, प्रा. बाळासाहेब पवार, युनूसभाई तांबटकर, आप्पासाहेब वाबळे, रामदास वागस्कर, नय्यरा सय्यद, अॅड. गौरी कुलकर्णी, समृध्दी वाकळे, नाईकवाडी, बापू चंदनशिवे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी नव्याने पारीत करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचे व भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 11 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणार्या चार शेतकर्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडले यामध्ये ते ठार झाले. तर बारा पेक्षा अधिक शेतकर्यांना भर रस्त्यात गाडी खाली चिरडल्याने शेतकरी गंभीर झाले होते. शेतकर्यांवर झालेल्या या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शेतकरी बांधवांची अस्थिकलश यात्रा 27 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या महात्मा फुले वाड्यातून सुरु झाली असून, ती विविध राज्यासह भारतभर फिरत आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असून, घेत असलेले निर्णय भांडवलदारांच्या हिताचे व शेतकरी विरोधी असल्याच्या जनजागरण करण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. भारतीय जनतेवर हुकूमशाही व गुलामगिरी लादण्याचे क्रूर मनसुबे जनतेसमोर उघडे करण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून जागर केला जात आहे. अस्थिकलशच्या अभिवादननंतर चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हुतात्मा स्मारक येथे बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांनी केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा व हुकुमशाहीचा भाषणाद्वारे निषेध व्यक्त केला.