धोत्रे बुद्रुकचे शेतकरी तीन वर्षे उलटूनही भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीतर्फे राष्ट्रीय महामार्गासाठी भ...
धोत्रे बुद्रुकचे शेतकरी तीन वर्षे उलटूनही भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीतर्फे राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकर्यांना जमीनीचा मोबदला देण्याची मागणी |
पारनेर/प्रतिनिधी :
तीन वर्षे उलटूनही राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमीनीचा शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसून, तातडीने धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील शेतकर्यांना भूसंपादन झालेल्या जमीनीचा मोबदला मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुंबई यांना पाठविले आहे. हा प्रश्न न सुटल्यास प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसह दि. ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर
बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ मध्ये पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक शिवारातील बागायत व जिरायत जमीनीचे भूसंपादन करण्यात आले होते. रस्ता पूर्ण होऊन तीन वर्षे झाले आहे. तरी देखील रस्त्यासाठी जमीनी
गेलेल्या शेतकर्यांना मोबदला जाणीवपूर्वक देण्यात आलेला नाही. मौजे धोत्रे बुद्रुक हद्दीतील भूसंपादन झालेल्या जमिनीसाठी १ कोटी ४१ लाख ६६ हजार इतका निधी उपलब्ध करुन देण्यास प्रांताधिकारी श्रीगोंदा- पारनेर यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालय नाशिक यांना विनंती केली होती.
मात्र अद्यापि हा निधी शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दोन वर्षापुर्वी शेतकर्यांनी जमीनीचा मोबदला मिळत नसल्याने रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र शेतकर्यांना भूसंपादन केलेल्या जमीनीचा मोबदला मिळण्यासाठी अद्यापि कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला तातडीने मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने करण्यात आली आहे.