...तर पारनेर तालुक्यातील गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण ! सुजीत झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर) जीव सृष्टीला वरदान म्हण...
...तर पारनेर तालुक्यातील गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण !
सुजीत झावरे पाटील
(माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर)
जीव सृष्टीला वरदान म्हणजेच पाणी त्यामुळे आपण आपल्या अनुभवतून नेहमी बोलतो कि 'पाणी हेच जीवन' आहे. पण आज आपण खरोखरच पाणी हा विषय गांभीर्याने घेतो का ? पुढील काळात आखाती देशांसारखी आपली परिस्थिती होऊ नये. हीच अपेक्षा मला स्वतःला अध्यात्मिक क्षेत्रात काम करणे व समाजसेवा करणे हे राजकारणा पेक्षा जास्त आवडते. आपल्या पुरोगामी विचारांचा पारनेर तालुका हा राज्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्याचे काम यापूर्वी स्व. शंकरराव काळे स्व. वसंतराव झावरे पाटील यांनी केले पारनेर तालुक्याला सध्या वरदान ठरलेले मांडओहोळ धरण, ढवळपुरी परिसराला वरदान ठरणारे काळू मध्यम प्रकल्प, भांडगाव येथील एम आय टॅंक, वडझिरे येथील शिव डोहो प्रकल्प, पिंपळगाव जोगे कालवे चारी अस्तरीकरण या सारखे मोठे प्रकल्प स्व. माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या माध्यमातून या तालुक्यात उभे राहिले.
मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना पिण्याच्या पाण्याची वनवा असलेले भाळवणी, वासुंदे, सावरगाव, हंगा, धोत्रे बुद्रुक, पळशी, वडगाव सावताळ अशा अनेक गावांत पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यान्वित केल्या आणि ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर मिनी नदीजोड प्रकल्पा सारखा एक नाविन्यपूर्ण राज्यातील एकमेव प्रकल्प काळकुप पाडळी तर्फे कान्हुर या गावांत राबविला त्यामाध्यमातून वाया जाणारे पाणी बंद पाईपलाईन मधून चरा वाटे पाझर तलावात सोडले त्यामुळे त्या भागातील पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला. पण नदीजोड सारखा विषयावर त्यावेळी विचार करण्याची मनस्थिती कोणाचीही नव्हती काहींनी या विषयाची खिल्ली उडवली पण निर्धार पक्का होता.
शेवटी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध केला व मिनी नदीजोड प्रकल्प पूर्ण करून यशस्वी केला.
मला मनोमन खूप आनंद झाला त्यानंतर असा एक प्रयोग वासुंदे गावातील कर्जुले पठार भागावरून वाया जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत केला चरा वाटे वाया जाणारे पाणी गावच्या पाझर तलावात सोडले. पहिल्याच पावसात तलाव भरला प्रत्येक गावच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जर आपण वाया जाणारे पाणी कोणतेही विद्युत उपकरण न वापरता जर गावच्या मूळ साठ्यात किंवा बंधारे, पाझर तलाव यामध्ये सोडले तर खेडे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील असा आशावाद वाटतो.
मात्र हे सर्व करत असताना दैनंदिन वापरातील पाणी देखील अत्यंत जपून वापरले पाहिजे ही सवय आत्मसात करणे गरजेची आहे. यापुढे असे छोटे-मोठे प्रयोग तालुक्यात करून गावे स्वयंपूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल ..
COMMENTS