वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा रोषाला सामोरे जा भोयरे गांगर्डा, कडूसच्या ग्रामस्थांनी आक्रमक होत दिला महावितरणाला इशारा पारनेर/प्रतिनिधी : पारन...
वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा रोषाला सामोरे जा
भोयरे गांगर्डा, कडूसच्या ग्रामस्थांनी आक्रमक होत दिला महावितरणाला इशारा
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा उपकेंद्रातून सोडला जाणारा कडूस फिडरवरील विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा असा सज्जड इशारा भोयरे गांगर्डा व कडूस ग्रामस्थांनी सुपा येथील कनिष्ठ अभियंता श्रेयस रुद्राकर यांना दिला.
शनिवारी दि. १३ रोजी दुपारी एक वाजता भोयरे गांगर्डा व कडूस येथील ग्रामस्थांनी सुपा येथील महावितरण कार्यालयावर वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता रुद्राकर यांना घेराव घातला. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक महिन्यापासून कडूस, भोयरे गांगर्डा येथे शेतीसाठी दिली जाणारी वीज कमी दाबाने मिळते. भारनियमनही जास्त केले जात आहे.
जेवढी वीज मिळते त्यात पाच दहा मिनिटही मोटरी चालत नसल्याने उभी पिके जळू लागली आहेत. चालू वर्षी हाताशी आलेले पीक वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीचा दिवस करून कसरत करावी लागत आहे. दिवसा व रात्री विद्युत पुरवठा कमी दाबाने सोडला जात असल्याने रोहित्र व शेतीपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
याचा शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासाठी अनेक वेळा आपल्या कार्यालयाशी संपर्क करूनही कुठलीही कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा भोयरे गांगर्डा, कडूस ग्रामस्थ आंदोलन हाती घेतील, असा इशारा दिला आहे.
COMMENTS