पुरोगामी विचारांचा वारसा जोपासायला हवा 📌संजय वाघमारे, पारनेर पारनेर हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे.मात्र पारनेरचे पुरोगामीत्व ओढूनताणून आ...
पुरोगामी विचारांचा वारसा जोपासायला हवा
📌संजय वाघमारे, पारनेर
पारनेर हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे.मात्र पारनेरचे पुरोगामीत्व ओढूनताणून आलेले नाही.केवळ विचारानेच नव्हे तर,राजकीय सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक दृष्ट्या तालुका पुरोगामी असल्याचे या विविध क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीमुळे अधोरेखित झाले आहे.अर्थात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे तालुका सर्वार्थाने विकसित झाला असे म्हणता येणार नाही.कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.या प्रक्रियेला पुरोगामी विचारातून,कालानुरूप गती देण्याचे काम निरंतर चालू असते ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.मात्र पारनेर तालुक्याचा पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याची,जोपासण्याची मोठी जबाबदारी तरूणाईवर,नव्या पिढीवर आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत त्या त्या कालखंडातील समाजधुरीणांनी पुरोगामी विचारांची कास धरल्याचे विविध उदाहरणांवरून स्पष्ट होते.थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाच्या निमीत्ताने भूमिअधिग्रहणाबाबत ठोस भूमिका घेत आधी पुनर्वसन नंतर अधिग्रहणाचा आग्रह धरला.ग्रामस्वच्छतेचे, रोजगार हमी योजनेचे महत्त्व बापटांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ओळखले होते.सेनापती बापटांच्या क्रांतिकारी विचारांनी
स्वातंत्र्य लढ्याला बळ दिले.ही उदाहरणे तालुक्यात पुरोगामी विचारांचे वारे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहात होते हे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत.
स्वातंत्र्य लढ्यात उजव्या विचारसरणीच्या कॉंग्रेसचे योगदान वादातीत असतानाही पारनेर तालुक्याने स्वातंत्र्यानंतर डाव्या विचारांचा अंगिकार केला.
शेतकरी,मजूर,कष्टकऱ्यांचा
प्रश्नांवर तालुक्यात आंदोलने झाली.सर्वसामान्यांची,
वंचितांची रोजची जगण्याची लढाई सुसह्य व्हावी यासाठी तालुक्यात कम्युनिस्ट पक्ष, तत्कालीन आमदार भास्कराव औटी, पक्षाचे कार्यकर्ते झटत असत.ते कालसुसंगत होते.त्यानंतरच्या काळात, आजतागायत तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार कॉम्रेड बाबासाहेब ठुबे,नंदकुमार झावरे, वसंतराव झावरे, विजय औटी हे
सर्वच नेते चळवळीतून पुढे आले.आमदार नीलेश लंके यांचे नेतृत्व सामाजिक चळवळीतून पुढे आले.एकूणच तालुक्याची पुरोगामी विचारांची परंपरा कायम आहे.जागतिकीकरण,आर्थिक उदारीकरणाचे वारे जगात आणि देशात वाहू लागल्यानंतर,९० च्या दशकात तालुक्यात डावा विचार मागे पडला.जागतिकीकरणाच्या रेट्यात ते अपरिहार्य होते.विजय औटी यांचा लाल बावटा ते भगवा व्हाया कॉंग्रेस हा प्रवास पारनेर तालुका उजव्या विचारसरणीकडे झुकला असल्याचे एक उत्तम उदाहरण आहे.तालुक्यातील जनतेने झालेले बदल सहजतेने स्वीकारले असले तरी सहिष्णुता कायम राहिली.टोकाचा उजवा विचार तालुक्याने स्वीकारला नाही.तालुक्याच्या पुरोगामीत्वाचे हे द्योतक आहे.
अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या आणि कायमस्वरूपी दुष्काळी अशी ओळख असलेल्या पारनेर तालुक्यासाठी शिक्षण हेच बागायत आहे.तालुक्यातील शिक्षणाचे प्रमाण,त्यातून उच्च पदावर कार्यरत असलेल्या तालुकावासीयांची संख्या उल्लेखनीय आहे.राज्याला केवळ शिक्षकच नव्हे तर विविध पदांवर काम करणारे अधिकारी पुरवणारा तालुका ही ओळख निर्माण झाली आहे.ही ओळख सहजा सहजी निर्माण झाली नाही तर पुरोगामी विचारांची कास धरणाऱ्या ग्रामीण भागातील अशिक्षित पालकांनी मुलांच्या शिक्षणाचा आग्रह धरला.त्यातूनच शैक्षणिक क्रांतीला हातभार लागला.तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे योगदान मोठे आहे.स्थानिक शिक्षण संस्थांबरोबरच रयत शिक्षण संस्थेने तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावला आहे.इंग्रजी शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे.असे असले तरी शिक्षण क्षेत्रात मोठी मजल मारणे अद्याप बाकी आहे.पारनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती होणे अपेक्षित आहे.नजिकच्या काळात शैक्षणिक क्रांती होईल असे वातावरण सध्या तालुक्यात आहे.
गेल्या सात आठ वर्षांत जगात डिजिटल युग अवतरले आहे.
डिजिटलायझेशनचा अनुभव तालुका घेत आहे.सन २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.इतर माध्यमांतून भाजपने केलेल्या प्रचाराच्या तुलनेत समाज माध्यमातून केलेला प्रचार जास्त प्रभावी ठरल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर मात्र समाज माध्यमांचे आणि त्यातून प्रचाराचे लोण थेट गावपातळी पर्यंत पोहचले.प्रचारासाठी,प्रचारकी थाटाच्या मजकूर सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.मात्र समाज माध्यमांचा अतिरेकी वापर होत असल्याचे चित्र सध्या आहे.पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा पारनेर तालुका समाज माध्यमाच्या अतिरेकी वापरातून असहिष्णुतेकडे झुकतो की काय असे वाटू लागले आहे.
समाज माध्यमे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे तुलनेत सोपे साधन आहे असे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात तसे नाही.समाज माध्यमांचे जसे फायदे आहेत तसे त्याच्या वापराबाबत योग्य दक्षता घेतली नाही तर समाज माध्यमांचा अतिरेकी वापर घातक ठरू शकतो याचे भान असणे आवश्यक आहे.विविध समाज माध्यमांचा यशस्वी वापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही तोटे जाणवू लागले आहेत.
समाज माध्यमांचा विचार करताना वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फोफावलेल्या न्यूज पोर्टलचा विचार होणे आवश्यक आहे.पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेली न्यूज पोर्टल समाजातील सर्व स्तरातील वाचकांची माहितीची भूक भागवण्यात यशस्वी ठरली आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.केवळ कॉपी पेस्ट करून प्रचारकी थाटाचा मजकूर वाचकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे पत्रकारिता नव्हे याचे भान असायला हवे.अर्थात याला काही पोर्टलचा अपवाद आहे.समाजभान ठेवून मजकूर प्रसिद्ध करणारी न्यूज पोर्टलची संख्या दुर्देवाने कमी आहे.पारनेर तालुक्याच्या पुरोगामी वारश्याचा विचार करता न्यूज पोर्टल्सनी अधिक प्रगल्भ होणे आवश्यक आहे.
दुसरे म्हणजे पत्रकारिता म्हणून आपण जे वाचकांपर्यंत घेऊन जाणार आहोत, ती माहिती आणणार कुठून याबद्दलही नेमकी माहिती अशा पत्रकारांकडे नसते. एक वेबसाईट काढायची आणि त्यामध्ये देश-विदेश, महाराष्ट्र असे भलेमोठे सेक्शन ठेवायचे. एवढ्या भल्यामोठ्या भौगोलिक प्रदेशाचे वार्तांकन करणार कसे,असा प्रश्न विचारल्यावर इकडून किंवा तिकडून बातम्या उचलणार अशी उत्तरे दिली जातात, म्हणजे एक प्रकारचे वाड्मयचौर्यच. कारण आपल्याला बातम्या हव्या असतील तर आपले प्रतिनिधी तिथे असले पाहिजेत किंवा एखाद्या वृत्तसंस्थेचे सदस्यत्व आपण घेतले पाहिजे. असे काहीच होत नाही. इकडून तिकडून ढापून बातम्या घेतल्या जातात. त्याच आपल्या वेबसाईटच्या नावावर खपवल्या जातात.आपण कुठलीच नितिमत्ता पाळायची नाही आणि लोकांना बातम्यांमधून नितिमत्ता शिकवायची असे प्रकार सध्या सुरू आहेत.कोणीच याला पत्रकारिता म्हणणार नाही.तालुक्याच्या पुरोगामीत्वाच्या व्याख्येत हे कुठे बसते हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो.
पत्रकारिता शिकून अथवा आपण पत्रकारिता करू शकतो या भ्रमात नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांना याची काहीच कल्पना नसते. अनेकांना तर बातमी कशी लिहायचे हेच नीटपणे समजलेले नसते.अशा वेळी स्वतःची न्यूज वेबसाईट सुरू करणे हे धाडसाचे आहेच पण अत्यंत चुकीचेही. डिजिटल माध्यमे नव्याने आली आहेत पण पत्रकारिता जुनी आहे.वाचकांचा पत्रकारितेवर विश्वास आहे.सोशल मीडियात हजारो क्रिएटर्स असले, तरी पत्रकारितेत असलेल्या जुन्या ब्रँड्सला वाचक अधिक महत्त्व देतात. या ब्रँड्सने माहिती दिली म्हणजे ती खरीच असणार, यावर वाचकांचे एकमत होते. पण नव्या न्यूज वेबसाईटवर वाचक फारसा विश्वास ठेवत नाही. त्यातील आशय खूप गंभीरपणे घेतही नाहीत. विश्वास एका दिवसात किंवा एका वर्षात तयार होत नाही.त्यासाठी अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागतात.न्यूज वेबसाईट काढून एका दिवसात आपली बातमी व्हायरल होईल आणि दुसऱ्या दिवशी आपण एकदम ‘मीडिया किंग’ होऊ हे केवळ स्वप्नरंजनच आहे. असे कधीच होत नाही आणि होणारही नाही.
तंत्रज्ञानामुळे डिजिटल माध्यमे माहिती वेगाने लोकांपर्यंत घेऊन जाताहेत. पण म्हणून प्रत्येकाने न्यूज वेबसाईट काढली पाहिजे असे मुळीच नाही. आपण चांगले पत्रकार आहोत म्हणजे आपल्याला न्यूज वेबसाईट काढून ती व्यवस्थितपणे चालविता येईल,असे समजण्याचेही कारण नाही.
न्यूज पोर्टल प्रमाणेच विविध समाज माध्यमे हाताळणारांनीही काही आचारसंहिता पाळणे चांगल्या सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.प्रत्येक बाबीवर प्रतिक्रिया देण्याची जबाबदारी आपलीच आहे अश्या आविर्भावात समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देताना नळकोंडाळ्यावर भांडणाऱ्या व्यक्तींच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवतात आणि ते हास्यास्पद असते.अर्थात हे प्रकार सार्वत्रिक आहेत.तालुक्याचा पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी समाज माध्यमे, आणि पोर्टल्सचा वापर अधिक प्रगल्भतेने होणे आवश्यक आहे.तसा तो नजिकच्या काळात होईल या अपेक्षेसह सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा...!!
(लेखक हे पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत)
COMMENTS