संतांची वैचारिक दिवाळी ! महाराष्ट्र म्हणजे विविध सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरांनी नटलेला सुंदर प्रदेश ! येथील प्रत्येक सण-उत्सव हा प्रतीका...
संतांची वैचारिक दिवाळी !
महाराष्ट्र म्हणजे विविध सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरांनी नटलेला सुंदर प्रदेश ! येथील प्रत्येक सण-उत्सव हा प्रतीकात्मक आणि नव विचारांची रुजुवात करून किंवा कांहीतरी टाकून देऊन, वर्ज्य करून साजरा केला जातो. अगदी चैत्राच्या पालवीनं मराठी नव्या वर्षाचं स्वागत करतांना इथली माणसं कडू लिंबाचा मोहर आणि गुळ खावून येणारं वर्ष हे आपण सर्वजण कडू-गोड आठवणींनी साजरं करण्याचं मनोमन ठरवतात, त्याबरोबरच येणाऱ्या उन्हाच्या झळा, उष्णता ही लिंबाचा फुलोरा आणि गुळाने मारून टाकण्याचे आयुर्वेदिक औषध प्राशन करून आयुर्वेद दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनवतात. असा हा भौतिक आणि सांकृतिक वसा आणि वारसा लोक भावनेने आणि विचाराने साजरा करतात. याबरोबरच हे सणसमारंभ साजरे होतांना येथील जनमाणसात कृषिसंस्कृतीचा महत्वपूर्ण ठेवा जोपासण्याचे काम सुद्धा सातत्याने केले जाते. प्रत्यके सण-उत्सव हा सोहळा म्हणून भौतिक पद्धतीने साजरा करतांना त्याला सुंदर विचारांची जोड देण्याचं महत्वपूर्ण कार्य येथील संत, विचारवंत, प्रबोधनकार आणि समाजसुधारक यांनी केलेले आढळून येते.
आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेने महाराष्ट्रातील सण-उत्सवांना प्रारंभ होतो. नंतर श्रावणात नागपंचमी, बैलपोळा, गणेशोत्सव, जेष्टागौरी आवाहन, दसरा आणि या सर्वच उत्सवांचा शेवट हा कार्तिक अमावश्येला दिपोत्सवाने म्हणजेच दीपावली साजरी करून केला जातो. जवळपास सर्व मराठी सणांची रेलचेल हि दिवाळी साजरी करून थंडावते. प्रत्येक सण हा काहीतरी प्रतिक म्हणून साजरा करतांना त्यामागील काही वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरा समाजात रुजविण्याचा प्रयत्न येथील सृजन करत आले आहेत. गुरुपूजन, प्राणी पूजन, निसर्ग देवतांचे पूजन, शेती-मातीचे पूजन, आई-वडिलांचे पूजन आणि शेवटी सृष्टीतील तिमिर गुण नष्ट करून प्रकाशपर्वाच्या पूजनाने 'प्रकाशोत्सव' म्हणजेच दिपावली साजरी केली जाते. सणसमारंभाचे उत्सव, सोहळे करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, वैचारिक,
आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विविध विचारप्रवाह आणि सांप्रदाय यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आढळून येते. त्या विविध प्रवाहामध्ये वारकरी सांप्रदाय हा येथील संस्कृतीच्या नसानसांमध्ये प्रवाही असून वारकरी सांप्रदायाने येथील समाजमनामध्ये प्रबोधनाची नांगरणी करून वैचारिक बीज खोलवर रुजविण्याचे महत्कार्य केलेले आढळून येते. मराठी आणि संस्कृत वाङ्मयामध्ये दिपावली सणाला विविध वैचारिक आणि पौराणिक संदर्भसुद्धा आढळून येतात.
महाराष्ट्रातील संतांनी प्रत्येक सण-उत्सवाप्रमाणे दिपावली सणाचे महत्व सांगत असतांना प्रकाशरूपी ज्ञानाची दिवाळी प्रकट करण्याचे तेजोमय कार्य केलेले आढळून येते. बदलत्या सामाजिक आणि वैचारिक परीपेक्षामध्ये प्रकाश म्हणजेच अंधार निवारण्याचे, 'तीमिरातुनी तेजाकडे' मार्गक्रमण करण्याचे सर्वोत्तम साधन !
मानवी मनातील षडविकारांची, अविवेकाची, निराशेची काजळी जर दूर करायची असेल तर ज्ञानरूपी पणती पेटवून असमंत नवविचारांनी उजळवून टाकावा लागेल. हाच दुर्दम्य आत्मविश्वास संतांनी येथील खेड्या-गावात राहणाऱ्या लोकांना कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून दिलेला आढळून येतो. संत वाङ्मयामध्ये सर्वच संतांनी दिवाळीचे प्रतिक वापरून समाजातील अज्ञानरूपी अंध:कार घालविण्याचे कार्य केलेले आढळून येते. कार्तिक महिन्यामध्ये मंदिरांमध्ये काकडा-भजन रंगत असतांना संत येथील भलत्या याती, नारी-नरांना सहज उपदेश करीत तमोगुनांना घालविण्याचे महान कार्य करतात. या संत साहित्यातील वैचारिक दिव्यांचा सोज्वळ प्रकाश जर अंतकरणामध्ये प्रविष्ट झाला तर साधकांचे जीवन तेजोमय विचारांनी प्रकाशमान होईल आणि तो आनंदाने नाचू-बागडू लागेल. म्हणूनच तत्कालीन समाज हा थोतांड-कर्मकांडाच्या चक्रव्युव्हामध्ये अडकलेला असतांना संत ज्ञानेश्वर माउली उपदेश करतात,
सुर्ये आधिष्ठीली प्राची | जगा जाणिव दे प्रकाशाची |
तैसी श्रोतया ज्ञानाची | दिवाळी करी ||
अशाप्रकारची ओवी लिहून माउली ज्ञानोबाराय आपल्या सैद्धांतिक आणि दृष्टांतिक सृजनत्वाचा अलौकिक अनुभवाविष्कार प्रकट करतात. सर्वसामान्य श्रोत्यांना आपले जीवन तेजोमय विचारांनी जर लखलखीत करायचे असेल तर त्यांनी सूर्योदयाच्या अगोदर प्रकट होणाऱ्या प्राची-प्रकाशाप्रमाणे आपल्या जीवनात मानवी देहाच्या नेणीवेची जाणीव ठेवून स्व:जीवन तेजोमय करावे. अविवेकरुपी षडरिपू जीवनातून निष्कशित करायचे असतील तर साधकाने सावधान झाले पाहिजे. असे जर झाले तर माणसाच्या जीवनातील अंधार अदृश्य होईल,
आणि मग निर्मल हृदयकमल म्हणजेच अंत:करण प्रकाशा उजळून जाईल ! अगदी 'उजेडी राहिले उजेड होऊन' या अभंगाप्रमाणे आंतर्बाह्य उजेडच उजेड ! आणि मग
मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी |
तैं योगिया पाहें दिवाळी। निरंतर ||
यातून माउली अत्युच्च विचार आणि जीवन सौंदर्य प्रकट करतात. मानवाचे जीवन जर अखंड तेजोमय, लखलखित व्हावयाचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मनातील अविवेकी विचार समूळ नष्ट करून विवेकरुपी बीजांकुर रुजवले पाहिजेत. योगीपुरुष ज्याप्रमाणे योगसाधनेच्या द्वारे सप्तचक्र नियंत्रित करून निरंतर आनंदी राहतात. त्याचप्रमाणे कोणत्याही योगसाधनेशिवाय सामान्य मनुष्य स्वहृदयामध्ये विवेकदीप प्रज्वलित करून निरंतर आनंदी राहू शकतो. म्हणूनच या दिपोत्सव पर्वावर माणसाने अखंड जीवन ज्ञानाच्या तेजोमय दिपाने, आनंदाने ओतप्रोत भरून टाकावे.
म्हणूनच माउली संपूर्ण विश्वात्मक देवतेला पसाभर दान मागतांना कोणतीही भौतिक, नश्वर गोष्ट मागत नाहीत, तर ते हे दान मागतात.
दुरितांचे तिमीर जावो। विश्वस्वधर्म सूर्ये पाहो।
जो जे वांच्छिल तो ते लाहो। प्राणिजात॥
दुरित म्हणजेच अज्ञानरुपी अंध:काराने ग्रासलेल्या लोकांच्या जीवनातील अंधार नष्ट होऊन ज्ञानरुपी प्रकाशाने त्यांचे हृद्य तेजोमय व्हावे आणि ज्याला जे पाहिजे ते त्याला निरंतर मिळत रहावे हीच विश्व प्रार्थना माउली करतात. संपूर्ण विश्वातील अज्ञान-अंधकार नष्ट व्हावा आणि प्रत्येक जीवनात प्रकाशरूपी ज्ञानोदय व्हावा हाच खरा दिवाळी सण !
याशिवाय कीर्तनाचे रंगात नाचत नाचत संत नामदेवराय ज्ञानाचा दीप घरोघरी उजळवतांना दिवाळी सणाला प्रत्यक्ष पांडुरंगालाच घरी घेऊन येतात.
सण दिवाळीचा आला। नामा राऊळाशी गेला॥
हाती धरोनी देवाशी। चला आमुच्या घराशी॥
भक्तीच्या बळावर संतांनी प्रत्यक्ष देव घरी घेऊन आले आणि विठ्ठलाला चराचरात आणि जळी-स्थळी प्राप्त केले. याचा परिणाम म्हणजे नामयाची दासी म्हणविली जाणाऱ्या वारकरी सांप्रदायाची आई संत जनाबाई जणू त्या सावळ्या विठूरायाला घरी बोलवायलाच सांगतात आणि त्यांच्या प्रेमाखातर देव जातो सुद्धा ! अगदी चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण असो कि सज्जन कसायची ढोरे ओढणे असो ! जातो म्हणूनच तर ते बोलावतात.
आनंदाची दिवाळी। घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी। गोविंद गोविंद॥
हि संतांची भक्तीची शक्ती त्यांनी समाजाला उपदेश करण्यासाठी खर्ची घातली. देवाला हृदयरूपी घरात कोंडून त्याला लिंबलोन करणारी हि संतमंडळी आणि त्यांचे विठ्ठलप्रेम, भक्ती अलौकिकच !
दुसरीकडे वारकरी सांप्रदायाचे कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरू तुकोबाराय आपली श्रेष्ठ आणि वैचारिक दिपावली साजरी करतांना जगण्याची अखंड दिवाळीच दिवाळी कशी झाली? याचं गोड चिंतन मांडतात.
साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा ॥
किंवा
दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥
हि दिवाळी संत वर्षभर साजरी करत असतात. संतांच्या जीवनाला ज्ञानाचा परीसस्पर्श झाल्यामुळे संतांना रोजचा दिवसच दिवाळी झाला आहे. संत ज्ञान, विचार आणि वचनांच्या मार्गाने मार्गस्थ झाले असता चंदनाने बोरी सुद्धा व्यापून टाकल्या जातील आणि विषारी नकारात्मक विचारांचे काटे अदृश्य होऊन त्याचं जीवन अंतर्बाह्य निर्मळ चंदन झालं. नितांत सुंदर झालं !
या संतांच्या अजरामर ज्ञान-वचनांची अमोघ दिवाळी पहिली आणि त्याची त्याची क्षणिक अनुभूती घेतली असता भौतिक आनंदोत्सवाबरोबरच आंतरिक ज्ञानानंद हा अलौकिक, अवीट, अतिगोड असल्याचा प्रत्यय येतो. ज्ञानोबा, संत नामदेव, संत जनाबाई, तुकोबा आणि इतर संतांच्या वचनांचा आणि त्यांच्या आव्हानात्मक जीवनाचा थोडक्यात विचार केल्यास आपले जीवन क्षणार्धात बदलून जाईल.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावडांना समाजाने समाजबाह्य केले. कुणी झोळीत पीठ वाढणे तर सोडाच साधं फुटकं खापर देत नाही. सर्वत्र जगण्याची अवहेलना, आई-वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलेलं असतांना चार भावडांनी येथील नतदृष्ट, कुजलेल्या विचारांच्या लोकांशी दोन हात करत प्रतीकाराशिवाय आपले जीवन नितांत सुंदर बनवले. येथील रेड्यांना सुद्धा अक्कल प्रदान करण्याचं महान कार्य या भावडांनी केलं. त्यांनी आनंदाची आणि ज्ञानाची दिवाळी साजरी केली. अत्यंत खडतर जगण्याचा उत्सव साजरा करून हरिपाठ, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभव सारखे अलौकिक, ज्ञान आणि जीवनाच्या तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेले ग्रंथ जगाला दिले.
तुकोबांचे जीवन यापेक्षाही खडतर ! प्रचंड दुष्काळ, संपूर्ण संसार भंगला, गावचा पाटील कोपला, धर्ममार्तंडांनी काट्याच्या काठ्यांनी मारलं. लिहलेले अभंग पाण्यात बुडवायला लावले. आई-वडील, बायको, मुलगा, गुरे-ढोरे पटापटा मेली. काय खावे, कुणीकडे जावे ? अनंत प्रश्नांनी जीवन वेढलेले असतांना तुकोबा मात्र डगमगले नाहीत. त्यांनी अभंग, भजन, भंडारा डोंगर, टाळ, वीणा सोडला नाही आणि आपलं संपूर्ण भोवताल आनंदाचे डोही आनंद तरंग करून आसमंत उजळवून टाकला. आनंदाचे तरंग प्रत्येकाच्या अंतरंगात रुजविले ! जीवन कृतार्थ झालं !
तेंव्हा आजच्या या कठीण, खडतर आणि महामारीच्या प्रसंगी आपण संत विचारांची कास धरली पाहिजे. नुसती भजनं म्हणून आणि ज्ञानेश्वरी वाचून चालणार नाही तर आपल्या भोवताल न पेटनारी चूल पेटवण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. रंजल्या-गांजल्या लोकांमध्ये ईश्वर पाहण्याची वारकरी धर्म पताका आपल्याला झळकत ठेवावी लागणार आहे. एखाद्या घरचा कर्ता व्यक्ती कोरोनाने गेला असेल त्या घरी जाऊन सांत्वनाचे दोन शब्द बोलून त्यांना उभारी देण्याचं काम काम करावं लागणार आहे. दु:खीतांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे याच्या एव्हढे पुण्य नाही. गरजवंतांना मदत करणे, भुकेल्यांना अन्न देणे आणि दु;खीतांचे सांत्वन करून त्यांना धीर देणे हीच खरी संत विचारांची दिवाळी साजरी केल्यासारखे होईल.
तेंवा
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्य पाहो ।
जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ॥
तेंव्हा प्रत्येकाने 'वसुधैव कुटुंबकम' या विश्वधर्माचे, संतविचारांचे पाईकपण अंगी बाणवून रंजल्या-गांजल्यांना हसतं-खेळतं करत मदत करून जर त्यांच्या जीवनातील एक क्षण जरी आनंदाने फुलवता आला, त्यांच्या जीवनातील किंचित तिमिर घालवून तेजोमय आनंद फुलविता आला तरच खरी संत विचारांची दिवाळी साजरी होईल अन्यथा सर्व फापट पसारा किंवा व्यर्थ बडबड ! चला तर मग साजरी करूया संतांची आनंद-विचार दिवाळी ! शुभेच्छा !
प्रा.डॉ.विठ्ठल खं.जायभाये
(व्याख्याता, कवी, कीर्तनकार, समीक्षक, लेखक, योग-प्राणायाम प्रशिक्षक)
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. ९१५८०६४०६८
COMMENTS