पिंपरी जलसेन येथील दशक्रिया विधी घाटासाठी दहा लाखांचा निधी मंजूर जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते यांच्याकडून निधी मंजूर ; ग्...
पिंपरी जलसेन येथील दशक्रिया विधी घाटासाठी दहा लाखांचा निधी मंजूर
जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते यांच्याकडून निधी मंजूर
; ग्रामस्थांतर्फे सत्कार
पारनेर / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला दशक्रिया विधी घाटाचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी या कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल नागरिकांनी दाते सर यांचे आभार मानले.
पिंपरी जलसेन येथील दशक्रिया विधी घाटाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अनेक वर्षांपासून नागरिकांची या कामासाठी मागणी होती. येथे दशक्रिया विधी घाट तयार करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानंतर दाते सरांनी या कामासाठी जिल्हा परिषदे मधून दहा लाखांचा निधी मिळवून दिला असून, त्याची प्रशासकीय मान्यता झाली आहे. लवकरच या दशक्रिया विधी घाटाचे काम पूर्णत्वास जाणार असून नागरिकांचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटणार आहे.
त्याबद्दल पिंपरी जलसेन येथील सरपंच सुरेश काळे, भास्कर थोरात, संतोष थोरात, पत्रकार चंद्रकांत कदम, बाळासाहेब वाढवणे, आदिनाथ कदम, सचिन काळे, रेवजी कदम आदींनी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांची भेट घेतली व त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला. दशक्रिया विधी च्या घाटाच्या कामासोबतच पिंपरी जलसेन येथील बस स्टॅन्ड चा प्रश्नदेखील दाते सरांनी लावला असून लवकरच बस स्टॅन्ड देखील होणार आहे. पिंपरी जलसेन मधील इतर कामांसाठी देखील भरभरून निधी देणार असून ग्रामपंचायत ने प्रस्ताव सादर करावे असे सभापती काशिनाथ दाते सर यांनी सांगितले.
पंडित थोरात यांनी दिलेले बक्षीसपत्र.....
पिंपरी जलसेन येथील दशक्रिया विधी घाटासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून होता. तेथे शासकीय जागा नसल्याने शासन स्तरावरून निधी मिळत नव्हता. त्यासाठी पिंपरी जलसेन येथील शेतकरी पंडित उर्फ पंढरीनाथ गणपत थोरात यांनी आपल्या स्वतःच्या जागेतील दोन गुंठे क्षेत्र ग्रामपंचायत च्या नावे बक्षीसपत्र करून दिल्याने हा दशक्रिया विधी घाटाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंडित थोरात यांनी बक्षीस पत्र करून दिल्यामुळेच दशक्रिया विधी घाट येथे होणार आहे. थोरात यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत असून नागरिकांनी थोरात यांचे आभार मानले.
COMMENTS