पारनेर सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले राजकीय आखाड्यात खलबते सुरू: ७० संस्थांना मतदानाचा अधिकार शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष पारनेर...
पारनेर सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
राजकीय आखाड्यात खलबते सुरू: ७० संस्थांना मतदानाचा अधिकार
शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने तालुक्यातील राजकीय पटलावरील हालचाली गतिमान झाल्या आहेत. संचालक मंडळातील निवडणुकीसाठी कोणाला रिंगणात उतरवायचे, याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.
२००३ साली जिल्हा सहकारी दूध संघातून तालुका संघ अस्तित्वात आला. दूध उत्पादकांची सोय झाली. झपाट्याने संकलन वाढले. सुप्यासारख्या वाहतूक दळणवळण सुविधा असणाऱ्या ठिकाणी अत्यंत मोक्याच्या जागेत पारनेर रोडलगत शहजापूर चौकात संघाचे संकलन सुरू झाले. दूध उत्पादकांबरोबरच कामगारांना काम मिळाले. परंतु अल्पावधीत खासगीकरणाची लाट आली व दूध संकलन घटू लागले. तत्कालीन संचालक मंडळाला दूध
संकलन टिकवून ठेवण्यात व वाढवण्यात अपयश आल्याने २०१० मध्ये संघ बंद पडला. नंतरच्या प्रशासक व संचालक मंडळाला तो सुरू करण्यात यश आले नाही.
जिल्हा दूध संघाकडून तालुका संघाच्या वाट्याचे जवळपास साडे चार कोटी रुपये मिळाले. पुन्हा सत्ता संघर्ष सुरू झाला यात कामगारांचे देणे मिटविण्यात आल्याने आता संघ सुरू करण्याची गरज काही धुरीणांना वाटू लागली. त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी आमदार नीलेश लंके यांची साथ लाभली.
संघ सुरू करून संकलन सुरू झाले. भकास पडलेल्या जागेचे रूपडे बदलले व संघाचे कामकाज सुरू झाले. त्यासाठी सुरवातीला स्व. दादासाहेब पठारे, संभाजी रोहोकले, सुरेश थोरात, आशा त्रिसदस्यीय समितीची निवड झाली. यात स्व. दादासाहेब पठारे यांनी संघ सुरू करण्याचा निर्धार केला. त्यासाठी लंके यांची राजकीय ताकद व सहकारी संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांची मदत मिळून संकलन सुरू
झाले. तत्पूर्वी राहुल शिंदे यांनी संघाच्या माध्यमातून संकलन करून खासगी प्लान्टच्या माध्यमातून दूध घेण्याचा यशस्वी प्रयोग केला होता.
आता दूध संघाचे सुपा येथील संकलन बरोबरच १ नोव्हेंबरपासून माळकूप येथील स्वमालकीच्या जागेत दूध संकलन सुरू केल्याचे व्यवसथापक अभिजीत करपे यांनी सांगितले. दूध संकलन वाढीसाठी प्रतिनिधी संभाजी रोहोकले, सुरेश थोरात, उत्तम गवळी, वसंत सालके, वैशाली पठारे प्रयत्नशील आहेत. त्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय आखाड्यात सहकारातील निवडणूक नक्कीच गाजणार आहे.
संघाच्या ३१ सप्टेंबर २०१८ पूर्वीच्या सभासद संस्थाना मतदानाचा अधिकार असून अशा ७० संस्था असून त्यांच्या प्रतिनिधींना मतदान अधिकार मिळणार आहे. ठराव करून प्रतिनिधींचे नाव निश्चित करण्यासाठी त्या त्या संस्थांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यात आघाडीचे सरकार असले तरी तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले तरी शिवसेनेची भूमिका काय राहील, ते कोणाबरोबर जाणार, असा प्रश्न आहे. याशिवाय भाजपचा गटही निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
COMMENTS