मोबाईल सुविधेमुळे कॉईन बॉक्स अडगळीत ! पारनेर प्रतिनिधी : शहरासह ग्रामीण भागात विविध दूरसंचार कंपन्यामार्फत अवघ्या १ रुपयात देशात कुठेही संप...
मोबाईल सुविधेमुळे कॉईन बॉक्स अडगळीत !
पारनेर प्रतिनिधी :
शहरासह ग्रामीण भागात विविध दूरसंचार कंपन्यामार्फत अवघ्या १ रुपयात देशात कुठेही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने पूर्वी संपर्काच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारी कॉईन बॉक्स सेवा सध्या ग्राहकांविना धूळखात पडून आहे. मोबाईल धारकांची संख्या शहरी भागासह ग्रामीण भागातही वाढल्याने गल्लो गल्ली दिसणारे कॉईन बॉक्स आता दिसेनासे झाले असून एसटीडी बुथचीही अवस्था तशीच झाली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी या उद्योगासाठी केलेली हजारो रुपयांची गुंतवणूक वाया गेली आहे.
एस.टी.डी. सेवेच्या प्रारंभापासून देशभरातील नातेवाईक, मित्रांशी, विविध कंपन्या व कार्यालयां शी संपर्क साधण्याचीसुविधा नागरिकांना या सेवेद्वारे उपलब्ध झाली. त्यामुळे दळणवळणाची गती वाढली. काही मिनिटात एकमेकांशी संपर्क होऊ लागला. ज्यांच्याकडे दूरध्वनी सुविधा उपलब्ध नव्हती, अशांसाठी
माफक दरात शहरी व ग्रामीण भागात एसटीडी बुथची सुविधा देण्यात आली, त्यातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला, ग्रामीण भागातील अनेक दुकाने, मेडिकल स्टोअर्स, हॉटेल्स, जनरल स्टोअर्स, पान टपरीवर कॉईन बॉक्स बसविण्यात आले व एसटीडी बुथवर देखील कॉईन बॉक्स ठेवण्यात येऊ लागले. प्रति कॉईन बॉक्ससाठी चार ते साडे चार हजारांची गुंतवणूक केली गेली. ग्रामीण भागासाठी एक हजार व शहरी भागासाठी दोन हजार रुपये अनामत रक्कम जमा करून दोन ते अडीच हजाराचे कॉईन बॉक्स खरेदी केले. याद्वारे संपर्क करण्यासाठी एक मिनिटाला एक रुपया टाकावा लागे. त्यातून बॉक्स धारकाला चाळीस पैसे कमिशन मिळत असे, शिवाय दुकानदाराला चिल्लरही मिळायची. त्यामुळे या ठिकाणी सतत वर्दळ दिसायची. परंतु दरम्यानच्या काळात शहरा सह ग्रामीण भागातही मोबाईल नेटवर्क झपाट्याने पसरले.
मोबाईल नावाच्या परदेशी पाहुण्याने कॉईनबॉक्स व एसटीडी बुथवर अतिक्रमण केले त्याचा फटका बुथधारक व कॉईन बॉक्स धारकांना बसला, त्यामुळे त्यांची हजारो रुपयांची यंत्र सामग्री सध्या वापराविना धुळखात अडगळीत पडून असल्याने अनेकांनी यासाठी केलेली गुंतवणूक पूर्णपणे वाया गेली. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागल्याने कॉईन बॉक्स ही संकल्पना इतिहास जमा झाली आहे.
COMMENTS