पाडळी आळे शिवारात बिबट्याची प्रचंड दहशत ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी पारनेर प्रतिनिधी : पाडळी आळे (ता. पारनेर) येथील गावडे मळा परिसरा...
पाडळी आळे शिवारात बिबट्याची प्रचंड दहशत
ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी
पारनेर प्रतिनिधी :
पाडळी आळे (ता. पारनेर) येथील गावडे मळा परिसरात बिबट्याच्या नर आणि मादीचा वावर आहे. ग्रामस्थांना अनेक वेळा ते निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या भागात वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पाडळी आळे परिसरात गेली दोन-तीन महिन्यांपासून बिबट्यांचा वावर आहे. आतापर्यंत या बिबट्यांनी अनेक पाळीव कुत्रे, कोंबड्या खाऊन फस्त केलेले आहेत. दररोज नियमितपणे या बिबट्यांचे गावातील नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन होत आहे. बिबट्यांचा मुक्तपणे या परिसरात संचार सुरू आहे. ऐन उभारीस असणाऱ्या पिकांना सायंकाळची वीज असल्याने शेतकरी वर्ग पाणी देण्यासाठी शेतात जातो.
या बिबट्यांपासून त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे वनविभागाने या भागात त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी येथील अंकुश गावडे, जगदीश गावडे, खंडू गावडे, अक्षय कापसे, संजय येवले, सचिन गावडे, अजित गावडे, ज्ञानेश्वर गावडे, अतुल गावडे या ग्रामस्थांनी केली आहे.