सरपंच प्रकाश गाजरे यांचे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाज हिताचे काम : राणीताई लंके टाकळी ढोकेश्वर येथे मूळव्याध व भगंदर तपासणी शिबिराचे आयोज...
सरपंच प्रकाश गाजरे यांचे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाज हिताचे काम : राणीताई लंके
टाकळी ढोकेश्वर येथे मूळव्याध व भगंदर तपासणी शिबिराचे आयोजन
शिबिराचा व्याधींनी ग्रस्त 80 रुग्णांनी घेतला लाभ
नगर येथील साईलीला हॉस्पिटलच्या डॉ. शिंदे दाम्पत्याने दिली मोफत सेवा
पारनेर/प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर गटातील ग्रामस्थांसाठी म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे हे आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक प्रेरणेतून विविध आरोग्यविषयक शिबिरे घेत आहेत. त्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील रुग्णांना या शिबिरांचा लाभ मिळत असून आज पर्यंत त्यांनी टाकळी ढोकेश्वर गटातील पोखरी, म्हसोबा झाप, खडकवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे, काटाळवेढा याठिकाणी विविध आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन केले होते व करत आहेत.
टाकळी ढोकेश्वर हे मोठे बाजारपेठेचे ठिकाण असून मंगळवारी दिनांक 18 रोजी या ठिकाणी सरपंच प्रकाश गाजरे व निलेश लंके प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठान तसेच साईलीला हॉस्पिटल केडगाव अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मूळव्याध व भगंदर तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील सुपा गटाच्या सदस्या सौ राणीताई निलेश लंके, राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस पार्टी माहिती तंत्रज्ञान विभाग अध्यक्ष जितेश सरडे, अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष कु. राजेश्वरीताई कोठावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
टाकळी ढोकेश्वर परिसरातील जवळजवळ व्याधींनी ग्रस्त अशा एकूण 80 रुग्णांची यावेळी अहमदनगर येथील साईलीला हॉस्पिटलचे मुळव्याध तज्ञ डॉ. संजय शिंदे व डॉ. वनिता शिंदे यांनी तपासणी केली. यावेळी डॉ. शिंदे दांपत्याचा राणीताई निलेश लंके, जितेश सरडे व राजेश्वरी कोठावळे यांच्या सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना राणीताई लंके म्हणाल्या की टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये म्हसोबा झाप चे सरपंच प्रकाश गाजरे तसेच टाकळी ढोकेश्वर येथील निलेश लंके प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी हे आमदार साहेबांच्या माध्यमातून समाज सेवेचे उत्तम असे काम करत आहेत तसेच आमदार साहेबांची प्रेरणा घेऊन आरोग्यविषयक सुरू असलेले काम हे नक्कीच समाज हिताचे आहे.
या कार्यक्रम प्रसंगी वासुंदे येथील जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई सचिव नितीन चिकणे, टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडूंगे, किरण उर्फ रामभाऊ तराळ, अशपाक हवलदार, पोखरी येथील ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष व सावरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गायखे, वासुंदे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र झावरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष प्रसाद कर्नावट, पांडुरंगशेठ आहेर, पांडुरंगशेठ भालके, विलास आहेर, लहू वाळुंज, अशोक वाळुंज, माऊली बेलकर, अरुण बेलकर, योगेश आगळे, नितीन ढोकळे, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्मचारी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे टाकळी ढोकेश्वर गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजसेवा....
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हसोबा झाप चे आदर्श सरपंच प्रकाश गाजरे हे टाकळी ढोकेश्वर गटामध्ये खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजसेवा करत असल्याचे दिसून येत आहे ते करत असलेली समाजसेवा ही गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे. असे यावेळी बोलताना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. राणीताई निलेश लंके यांनी मत व्यक्त केले.
साईलीला हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत सेवा..
सरपंच प्रकाश गाजरे यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठान व अहमदनगर येथील साईलीला हॉस्पिटल यांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथे मुळव्याध भगंदर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉ. संजय शिंदे व डॉ. वनिता शिंदे यांनी गरजू व सर्वसामान्य रुग्णांवर यावेळी मोफत उपचार व तपासणी केली तसेच व्याधी संदर्भात सल्ला दिला.