पारनेर तालुक्यात संगनमताने अवैध वाळू उपसा जोमात तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ 'महसूलसह पोलिस' प्रशासन ही अपयशी दिवसाढवळ्या प्रशास...
पारनेर तालुक्यात संगनमताने अवैध वाळू उपसा जोमात
तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ
'महसूलसह पोलिस' प्रशासन ही अपयशी
दिवसाढवळ्या प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक
यंत्रणेतील फितुरांचा समाचार घेणार का?
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून, तो रोखण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरले असल्याचे दिसून येत आहे. महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून माफियांकडून जोमात वाळू उपसा केला जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधितांना कोणाचही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
मांडवा नदीपात्रामध्ये सर्रास जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने वाळू उत्खनन केले जात आहे. डंपर, ट्रॅक्टर व ट्रकच्या साहाय्याने वाहतूक केली जात आहे. हे नदीपात्र गेल्या अनेक वर्षांपासून वाळू माफियांचा अड्डा बनले आहे. हा अवैध वाळूउपसा रोखण्याचे मोठे आव्हान तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आहे. पारनेर तहसीलदारपदाचा नुकताच कार्यभार हाती घेतलेले शिवकुमार आवळकंठे हे उत्तम प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तालुक्यातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. वाळू माफियांना रोखण्याचे आव्हान ते कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पारनेर हा दुष्काळी तालुका ओळखला जात असला, तरीही तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहणाऱ्या ओढ्या नाल्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहून येते. ही वाळू प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत राजरोसपणे वाळू माफिया चोरून नेतात. तालुक्यातील उत्तरेला असणाऱ्या मांडवा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळू आहे. अनेक दिवसापासून या भागांमध्ये वाळूचे लिलाव होत नाहीत.
त्याचा फायदा वाळू माफियांना होत असून, ते छुप्या पद्धतीने व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करतात. अनेक वेळा वाळू माफियांच्या हैदोसामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. वेळोवेळी या भागातील नागरिकांनी आवाज उठविला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी लक्ष वेधुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यंत्रणेतील फितुरांचा समाचार घेणार का?
मांडवा नदीपात्रात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. राजरोस वाळू वाहतूक होत असताना या माफियांसोबत कोणाची सलगी आहे, याचा शोध घ्यावा लागणार आहे. मंडल अधिकारी, तलाठ्यांच्या संगनमताने वाळूमाफिया राजरोसपणे वाळू वाहतूक करतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तहसीलदार आवळकंठे हे यंत्रणेतील फितुरांचा समाचार घेणार का? असा सवाल आहे.
दिवसाढवळ्या प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक
तालुक्यात वाळू माफियांना रोखण्यात महसूल सोबतच स्थानिक पोलिस प्रशासनही कुचकामी ठरताना दिसत आहे. दिवसाढवळ्या पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत विना नंबरच्या गाड्या वाळू वाहतूक करताना आढळून येतात. असे असताना त्यांना रोखण्यात पोलिस अधिकाऱ्यांना यश का येत नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.