शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे महावितरण नरमले; खंडित केलेला वीजपुरवठा केला पुर्ववत कृषीपंपांना सुरळीत व पुर्ण क्षमतेने वीजपुरवठा न मिळाल्...
शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे महावितरण नरमले; खंडित केलेला वीजपुरवठा केला पुर्ववत
कृषीपंपांना सुरळीत व पुर्ण क्षमतेने वीजपुरवठा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार
शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांचा इशारा
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार उपकेंद्रातंर्गत येणाऱ्या किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल या गावांना गत एक महिन्यापासून सुरळीत व पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एक महिन्यापूर्वी किन्ही फिडरचा ३३ / ११ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला होता. त्यामुळे वरील गावांना गोरेगाव सबस्टेशनवरून विजपुरवठा केला जात होता हा विजपुरवठा पुर्ण क्षमतेने होत नसल्याने अतिरिक्त भार निर्माण होऊन रोहिञ जळणे, कृषी पंप जळणे, विद्युत वाहक वाहिन्या तुटणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागल्या होत्या.
मागील आठवड्यात तर वरील गावांना राञीचा विजपुरवठा केला जात होता. परंतु अतिरिक्त भारामुळे विजपुरवठा वारंवार खंडित होत असे किंवा राञभर कृषीपंपांना वीजच मिळत नसे आणि अशा परिस्थितीमध्येच महावितरण कंपनीने सोमवारी वरील गावांचा कृषी पंपाच्या थकीत विजबील वसुलीसाठी विजपुरवठा खंडित केला. यामुळे शेतकरी वर्गात महावितरण कंपनीबद्दल प्रचंड नाराजी पसरली व अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनी विरोधात कान्हुर पठार येथिल कार्यालयासमोर सोमवारी सकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलनादरम्यान महावितरण कंपनीच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता श्री भुजबळ उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांचा पारा अधिकच चढला व आंदोलकांनी या वेळी महावितरण कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
अखेर दोन तासानंतर श्री भुजबळ आंदोलनस्थळी उपस्थित झाले. यावेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील व शेतकऱ्यांनी विजेच्या तक्रारींचा व प्रश्नांचा भुजबळ यांच्यावर अक्षरशः वर्षावच केला. आंदोलक शेतकऱ्यांचा आक्रमक पविञा व प्रश्नांचा भडिमार यामुळे श्री भुजबळ व महावितरण कंपनीचे कर्मचारी अक्षरशः निरूत्तर झाले.
आठ, दहा दिवस किन्ही , बहिरोबावाडी, तिखोल या गावांना सुरळीत व पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करावा तरच आम्ही विजबील भरू अन्यथा एक छदामही विजबील भरणार नाही अशी आक्रमक भुमिका घेत शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यादरम्यान श्री भुजबळ यांनी महावितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी उपाभियंता श्री रोहनकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत शेतकऱ्यांच्या मागण्या व तक्रारींची माहिती दिली असता श्री रोहनकर यांनी देखील सकारात्मकता दाखवत वरील गावांचा आठ, दहा दिवस विजपुरवठा खंडित करणार नसल्याचे आश्वासन दिले व त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करत महावितरण कंपनीने आमच्या मागण्या व समस्या गांभीर्याने घेत त्यावर वेळेत तोडगा काढल्यास महावितरण कंपनीला वीजबिल भरून सहकार्य करू पण आमच्या समस्या जैसेथ्याच राहिल्या तर माञ एकही शेतकरी वीजबिल भरणार नसल्याचे सांगितले. तद्नंतर महावितरणने शेतकऱ्यांपुढे नरमाईची भुमिका घेत तात्काळ वीजपुरवठा पुर्ववत केला.
या वेळी किन्हीचे उपसरपंच हरेराम खोडदे, माजी सरपंच मानसिंग देशमुख, किसन खोडदे, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे, बापु व्यवहारे, राजाराम देठे, संतोष खोडदे, यशवंत व्यवहारे, संजय खोडदे, सखाराम खोडदे, मारूती सावंत, गंगाधर देठे पाटील, जयसिंग खोडदे, बाबासाहेब व्यवहारे, संदिप खोडदे, संपत खोडदे , अशोक खोडदे मेजर, सुभाष खोडदे, साहेबराव खोडदे, संजय खोडदे, रामभाऊ साकुरे, दत्ताञय साकुरे, भारत ठाणगे, रामदास देठे, संग्राम खोडदे, मोहन मोढवे, किरण व्यवहारे, दादाभाऊ मोढवे, संतोष व्यवहारे, सुभाष मोढवे, सुनील खोडदे, अशोक खेसे, नितीन खोडदे, संपत खोडदे, प्रताप खोडदे, चेतन पवार, विनोद खोडदे, अनिल खोडदे, लक्ष्मण व्यवहारे, अनिल खेसे, भाऊसाहेब खोडदे, सखाराम साकुरे, आदि उपस्थित होते.
किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल या गावांना पुर्ण दाबाने व अखंडितपणे विजपुरवठा करावा अशा पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुचना !
पारनेर तालुक्यात कान्हुर पठार सेक्शन वीजबिल वसुली मध्ये अव्वल स्थानावर आहे. परंतु त्या तुलनेत शेतीसाठी वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीने या भागात शेतीसाठी पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करण्यासाठी ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या तातडीने करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करावा व या पठार भागावरील हंगामी बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-- अनिल देठे पाटील
शेतकरी नेते
COMMENTS