पाडळी आळेत तरुणाचा खून; पारनेर तालुक्यातील घटना पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील पाडळी आळे शिवारात एका चोवीस वर्षीय तरुणाचा गळा चिरून ख...
पाडळी आळेत तरुणाचा खून; पारनेर तालुक्यातील घटना
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पाडळी आळे शिवारात एका चोवीस वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. निघोज येथील एका हॉटेलमध्ये हा तरुण काम करीत होता. दरम्यान, हा खून कोणी व कशासाठी केला, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
येथील एका हॉटेलमध्ये कामाला असलेला मन्सूर अन्सारी (वय २४, रा. बिहार) हा मंगळवारी कामावरून सुटून गावात गेला. त्याने दारू पिऊन गावात धिंगाणा घातला. सायंकाळी पाच वाजता त्याने हॉटेल मालक राहुल लाळगे यांचा फोन करून मी पारनेर कारखाना परिसरात जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मालकाला फोन करून मला हॉटेलवर यायचे आहे, असे सांगितले व फोन बंद केला.
यावेळी एक हिंदी भाषिक तरुणही त्याच्या बरोबर होता. मात्र, बुधवारी सायंकाळी सात वाजता पोलिस निरीक्षक घनश्याम बळब यांना निनावी फोन करून या खुनाची माहिती दिली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हा तरुण मरण पावला होता. त्याचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला होता.
पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सोशल मीडियावर या तरुणाची बातमी पसरताच हॉटेल मालक राहुल लाळगे यांनी त्यास ओळखले. लाळगे यांच्या फिर्यादी वरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक घनश्याम बळब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.