वेब टीम : मुंबई भारतासह जगभरातील श्रोत्यांना अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या...
वेब टीम : मुंबई
भारतासह जगभरातील श्रोत्यांना अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं.
लता दीदींच्या जाण्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या २८ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज सायंकाळी सात वाजता लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, अभिनेता शाहरूख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्षचक्र अर्पण करून लतादीदींचं अंतिम दर्शन घेतलं.
हजारो गाण्यांना स्वरांचा साज चढवत अजरामर करणाऱ्या गान कोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं. आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांचं पार्थिव प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार्थिव आणण्यात आलं.
शिवाजी पार्क येथे पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधींसह अंत्यसंस्कार कऱण्यात आले. त्यांचे बंधू ह्रद्यनाथ मंगेशकर यांनी लता मंगेशकरांच्या पार्थिवाला अग्नी दिला.