वेब टीम : सिंधुदुर्ग शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब या...
वेब टीम : सिंधुदुर्ग
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.
दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे आणि राकेश परब या दोघांनाही कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घातला आहे. सरकार पक्षातर्फे ऍड प्रदीप घरत, तर आमदार नितेश राणे, राकेश परब यांच्यासाठी ऍड. सतीश मानेशिंदे, ऍड.संग्राम देसाई, ऍड.राजेंद्र रावराणे आदींनी युक्तिवाद केला.
आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आले.
Sindhudurg court grants bail to BJP MLA Nitesh Rane in attempt to murder case
— Bar & Bench (@barandbench) February 9, 2022
report by @Neha_Jozie #NiteshRane
Read story: https://t.co/C5D7QtJO8I pic.twitter.com/j3EhcLNYPp
ते या ठिकाणी उपचार घेत आहेत. दरम्यान आज (९ फेब्रुवारी) त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निर्णय दिला.
याबाबत माहिती देताना आमदार नितेश राणे याचे वकील ऍड.संग्राम देसाई म्हणाले, “नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्या दोघांना कणकवली तालुक्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे.
तसेच दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. याशिवाय पोलीस तपासात सहकार्य करतानाच पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे.”
“पोलिसांनी जलदगतीने तपास करत आहोत, असे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच दोषारोपपत्र दाखल होईल अशी अपेक्षा आहे. तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळून हजर राहावे लागेल. मात्र, अन्य दोन संशयित फरार आरोपींचा राणे यांच्याशी काही संबंध नाही,” असंही संग्राम देसाई यांनी सांगितले.
राणे यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे न्यायालयात हजर होते ते म्हणाले, जामीन मंजूर झाला आहे आता आणखी काही बोलणार नाही.” सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचला असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर करण्यात आला होता.
आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाल्यावर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. कुडाळमध्ये घोषणाबाजी करत फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगडमध्येही फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
COMMENTS