वेब टीम : मुंबई शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावध...
वेब टीम : मुंबई
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे.
दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे, जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये असाही आरोप त्यांनी केला आहे.
विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझी भेट घेत राज्यातील सरकार पाडण्यासाठी मदत मागितली होती. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील यासाठी मदत करावी असा त्यांचा हेतू होता. मी नकार दिला आता मला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकी देण्यात आली.
जेलमध्ये राहावं लागलेल्या माजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांप्रमाणे मलाही परिणाम भोगावे लागलील असं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर माझ्यासोबत कॅबिनेटमधील इतर दोन वरिष्ठ मंत्री आणि याशिवाय इतर दोन मंत्र्यांनाही पीएमएलए अंतर्गत जेलमध्ये टाकणार आहोत अशी धमकी देण्यात आली.
महत्वाचे नेते जेलमध्ये गेल्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं त्यांचं म्हणणं होतं असं राऊतांनी पत्रात सांगितलं आहे. त्याचप्रमाणे भाजपासोबत युती तुटल्यापासून आमच्या पक्षाच्या खासदार, नेत्यांना ईडीच्या माध्यमातून टार्गेट केलं जात आहे.
आमचे नेते, खासदार यांच्यासहित त्यांचे नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांचाही छळ केला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.
मुलीच्या लग्नाच्या खर्चासंबंधी चौकशी केली जात असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, माझ्या मुलीचं २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झालं. ईडी आणि इतर तपास यंत्रणा डेकोरेटर तसंच इतर कंत्राटांना समन्स बजावत असून धमकावत आहेत. माझ्याकडून ५० लाख रोख मिळाले असा जबाब देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत.
त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा छळ केला जात आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी यावेळी अलिबागमध्ये आपण १७ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारावरुन संबंधितांना धमकावत खोटी माहिती देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे
संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही पाहत राहा फक्त याचे सुत्रधार कोण आहेत. बेकायदेशीरपणे ईडी ऑफिसमध्ये जाऊन कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत. ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाही ना? मग हे दोन-तीन लोक, कार्यालयात बसतात. ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांना आदेश देतात. काय करायचंय? कोणाला बोलवायचं? कोणाला टॉर्चर करायचं?
मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय आणि त्यांना माहितीये मला काय सांगायचंय ते." "हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबालाही भयंकर त्रास देत आहेत. खोटे पुरावे निर्माण करतात. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो. मी मागेही म्हणालो, आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही.", असं संजय राऊत म्हणाले.