file photo वेब टीम : दिल्ली भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. विखे म्हणाले की, महाविकास आघाड...
file photo |
वेब टीम : दिल्ली
भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. विखे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकतर मोदींनी केलेला विकास दिसत नाही किंवा ते विकास पाहू इच्छित नाहीत. अथवा त्यांच्या मनातील भावना बाहेर येत नाहीत.
नितीन गडकरींनी महाराष्ट्रात अनेक विकासकामांचे उदघाटन केले. त्या कार्यक्रमांचे कोणतेही व्हिडीओ काढले तर त्यात महाविकास आघाडीचे मंत्री आणि खासदारच दिसून येत आहेत. मोदीजींनी निधी दिलेल्या कार्यक्रमात हे लोक दिसतात पण संसदेत याबाबत कुणीच बोलत नाही.
नितीन गडकरींनी ५० टक्के सीआरएस फंड महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. पण हे लोक पंतप्रधानांचा उल्लेखही करत नाही. यावरून हेच दिसतंय की सेवा कुणीतरी करतंय आणि मेवा दुसराच खातोय. माझ्या मतदारसंघात गडकरींनी १० हजार किलोमीटरच्या रस्त्यांसाठी निधी दिला आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र फक्त टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.'सहकार मंत्रालय सुरु केलं हा सर्वात मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे स्वातंत्र्यानंतर कधीच झालं नव्हतं. आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया शेतकऱ्यांचं बळकटीकरण हे सहकार क्षेत्रातूनच सुरु झालं आहे. माझ्या आजोबांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरु केला.
युपीए सरकारने शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना फक्त कर्ज घेण्यास सांगितले. त्यामुळे दहा वर्षांच्या युपीएच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काही नेत्यांनी याच साखर कारखान्यांना कमी दरात खरेदी केले. हा त्यांचा समाजवाद आहे.
आमच्या सरकारने साखर उद्योगाला बळ दिले. सबसिडी दिली. ३१०० रुपयांची एमएसपी फिक्स केली. साखरेचे दर नियंत्रणात आणले. इथेनॉलला प्रोत्साहन दिले. या सगळ्या निर्णयांचा लाभ महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांनी ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी घेतला. त्याच्या मदतीने त्यांनी एफआरपी दिली. पण कधी मोदीजींची, त्यांच्या कामांची, योजनांची स्तुती केली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून महाविकास आघाडीने आंदोलन केले. केंद्र सरकारने केंद्रीय एक्साइज ड्युटी कमी करून किमतीत घेत केली त्यावेळी राज्य सरकारनेही कर कमी करणे आवश्यक होते. पण त्यांनी कर कमी केला नाही. त्यांनी दारूवरील कर कमी केला. वाईन दुकानात विक्रीला ठेवण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. महाविकास आघाडीची सत्तेची नशा जनता लवकरच उतरवेल, आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला.
COMMENTS