पठार भागाचा ढाण्या वाघ स्व. रावसाहेब (अण्णा) ठुबे गणेश जगदाळे/पारनेर पुरोगामी विचारांच्या पारनेर तालुक्यात समाजकारणात राजकारणात कान्हूर पठार...
पठार भागाचा ढाण्या वाघ स्व. रावसाहेब (अण्णा) ठुबे
गणेश जगदाळे/पारनेर
पुरोगामी विचारांच्या पारनेर तालुक्यात समाजकारणात राजकारणात कान्हूर पठार सारख्या दुष्काळी ग्रामीण भागातून येऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले पठार भागाचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखले जायचे असे पारनेर पंचायत समितीचे मा. उपसभापती स्व. रावसाहेब(अण्णा) ठुबे यांचे आज २३ वे पुण्यस्मरण स्व. रावसाहेब अण्णा ठुबे म्हणजे भारदार शरीरयष्टी असलेलं सुस्वभावी देखणं राजबिंड व्यक्तिमत्व आपल्या कार्यकुशलतेने व स्वभावाने सर्वांचीच मने जिंकणारे हे व्यक्तिमत्व समाजकार्यात नेहमीच पुढे होते. त्या माध्यमातून त्यांनी नेहमी माणुसकीचे राजकारण केले.
दुष्काळी पट्ट्यातील कान्हूर पठार सारख्या पठार भागावर सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला वडील शिक्षक व आई गृहणी असल्यामुळे समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले. त्यामुळे लहानपणापासून स्व. रावसाहेब (अण्णा) ठुबे यांच्यावर सामाजिक राजकीय प्रभाव निर्माण झाला. ते एकूण पाच भावंडे त्यामुळे घरची परिस्थिती सर्वसाधारण होती कुटुंब मोठे असल्यामुळे वयाच्या अवघ्या विशीत असताना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व आपल्या भविष्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. मुंबईमध्ये ते नोकरीला लागले मुंबई मध्ये प्रसिद्ध व्यवसायिक याकूब शेठ इनामदार यांच्याकडे ऑफिस बॉय व गाडीवर किन्नर म्हणून ते काम करू लागले. स्व. रावसाहेब (आण्णा) ठुबे यांना गावची असलेली ओढ व गावांमध्ये त्यांचा असलेला मोठा युवक मित्रपरिवार यामुळे मुंबईमध्ये ते फार काळ रमले नाही.
त्यांनी पुन्हा गावाची वाट धरली व मा. आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांच्या माध्यमातून गावांमध्ये समाजसेवा, समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करण्यास त्यांनी सुरुवात केली. गावामध्ये श्रीराम नाट्य मंडळाची स्थापना करत त्यामाध्यमातून गणेश जयंती, शिवजयंती, भीमजयंती मुक्ताई यात्रा उत्सव, पांडुरंग अखंड हरिनाम सप्ताह तसेच सण-उत्सव गावातील श्रावण बैल पोळा, गौराई यात्रा उत्सव असे विविध समाजिक ऐतिहासिक उपक्रम त्यांनी घेण्यास सुरुवात केली. यामधून गावातील युवक वर्ग त्यांनी एकत्र आणला. गावामध्ये एकोप्याची भावना निर्माण केली गावामध्ये आनंदमय वातावरण त्यामुळे निर्माण झाले. स्व. अण्णा हे स्वतः हाडाचे कलाकार होते.
त्यांनी त्याकाळात अनेक नाटकांमध्ये काम केले श्रीराम नाट्यमंडळाची स्थापना करून गावात त्यांनी अनेक कलाकारांना तयार करत नाट्यमंडळाच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. श्रीराम नाट्य मंडळाच्या माध्यमातून नाटके करत असताना महाराष्ट्र नाट्यस्पर्धेत राज्य स्तरावर त्यांना त्यावेळेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. यामुळे कला क्षेत्रात त्यांचे असलेले उल्लेखनीय कार्य लक्षात येते. अष्टपैलू असलेले हे व्यक्तिमत्व मा. आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांच्या लक्षात आले. त्यामुळे निर्भिड कणखर व करारी स्वभावाच्या राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या रावसाहेब अण्णा ठुबे यांना राजकारणात संधी देण्यास सुरुवात केली.
प्रथम कान्हूर पठार गावचे सरपंचपद त्यांनी भूषविले सलग तेरा वर्ष ते कान्हूर पठार गावचे सरपंच होते. त्या माध्यमातून गावचा चेहरामोहराच त्यांनी मा. आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांच्या नेतृत्वाखाली बदलवला गावात अनेक विकासाची कामे त्यांनी केली. पठार भागाला पाणी मिळाले पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन त्यांनी वेळोवेळी आंदोलनात सहभागही घेतला त्या काळात पठार भागावरील राजबिंड व्यक्तिमत्त्व असलेले स्व. रावसाहेब अण्णा ठुबे आदर्श सरपंच म्हणून काम करत होते. पारनेर तालुक्याचे माजी आमदार कॉ. स्व. बाबासाहेब ठुबे, मा आमदार स्व. शंकरराव काळे, मा आमदार नंदकुमार झावरे, मा आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील, मा. आमदार विजयराव औटी यांच्याशी त्यांचा थेट जिव्हाळ्याचा संपर्क होता. त्या माध्यमातून त्यांनी पठार भागावर अनेक विकासाची कामे मार्गी लावली.
सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन रावसाहेब अण्णा नेहमी काम करत होते.
पठार भागावर काम करत असताना सर्वसामान्य जनतेशी स्व. रावसाहेब अण्णा यांची चांगली नाळ जोडली गेली त्या माध्यमातून त्यांनी मोठं युवक संघटन उभे केले. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारे रावसाहेब अण्णा एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व होते. पठारभागा वरील शेतकरी, कष्टकरी, दीन-दलित, बलुतेदार, आदिवासी, कामगार लोकांसाठी त्यांनी मोठे काम उभे केले. शासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना शेतीसाठीची अवजारे त्यांनी त्याकाळात मिळून दिली.
तसेच शासकीय योजनांचा व्यक्तिगत लाभही मिळवून दिला. त्यांच्या कामाचा वाढता आलेख लक्षात आल्यामुळे राजकारणात वरिष्ठ पातळीवर संधी मिळावी म्हणून मा. आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांनी त्यांना कान्हूर पठार गणात पंचायत समितीची उमेदवारी दिली. मिळालेल्या संधीचे सोने करत स्व. रावसाहेब अण्णा ठुबे यांनी पारनेर पंचायत समिती वर तालुक्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येत विक्रम केला. त्यांच्या या विजयाची दखल घेत त्यांना आशाताई देशमुख सभापती असताना पारनेर पंचायत समितीमध्ये 1997 ते 1998 मध्ये उपसभापती पदी काम करण्याची संधी मिळाली. यावेळी यशाच्या उच्च शिखरावर असलेल्या रावसाहेब (अण्णा) ठुबे यांनी संधीचे सोने करत पठार भागावर अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली.
राजकारणात रावसाहेब अण्णा ठुबे यांचा आलेख यादरम्यान चढत होता.
तत्कालीन अहमदनगरचे खासदार भीमराव बडदे यांना खासदार करण्यामध्ये पारनेर तालुक्यातून स्व. रावसाहेब अण्णा ठुबे यांचा महत्वपूर्ण वाटा होता. त्यांनी भीमराव बडदे यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पारनेर तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य त्यांना मिळवून दिले. पारनेरचा राजकारणात त्यांचा यशस्वी असा शिरकाव झाला. लोकनेते म्हणून ते जनमानसात ओळखले जाऊ लागले. सर्वसामान्य गरीब दीन दलित समाजासाठी ते कार्य करू लागले. उपसभापती स्व. रावसाहेब (अण्णा) ठुबे यांचा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे, खासदार बाळासाहेब विखे यांच्याशी थेट संपर्क होता ते सर्व स्व. रावसाहेब अण्णा यांच्या आग्रहास्तव पारनेर तालुक्यात अनेक वेळा येऊन गेले.
मा. आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांच्या माध्यमातून त्यांनी पठार भागावर मोठे काम उभे केले. नियतीला हे मान्य नव्हते मा. आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांच्या अपघाती निधन झाल्या नंतर त्यांचे मोठे स्मारक कान्हूर पठार गावांमध्ये उभे राहिले पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून स्मारक उभारणीसाठी त्यांनी कंबर कसली स्मारकाच्या निर्मितीसाठी ते अहमदनगर जिल्हा मध्ये फिरत असताना कामानिमित्त लोणी प्रवारा राहुरी कोपरगाव येथे खासदार बाळासाहेब विखे मंत्री शंकरराव कोल्हे खासदार प्रसाद तनपुरे यांना भेटण्यासाठी गेले होते भेटून मागे येत असताना ३० मार्च १९९९ साली कानूर पठार गावावर पुन्हा एकदा काळाचा घाला घातला गेला आणि यामध्ये कॉ. बाबासाहेब ठुबे यांचे पंचरत्न म्हणून पारनेर तालुक्यात ओळखले जाणारे उपसभापती स्व. रावसाहेब अण्णा ठुबे, सरपंच मा. दिलीपराव ठुबे, मा. चेअरमन राजे शिवाजी पतसंस्था व्ही. बी. ठुबे सर, मा. चेअरमन दूध संस्था सिदूभाऊ ठुबे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण शेळके, यांचे प्रवासादरम्यान ढवळपुरी फाट्यावर अपघाती निधन झाले. हा कान्हूर पठार गावच्या दृष्टीने काळा दिवस ठरला आज स्व. रावसाहेब अण्णा ठुबे यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्याच्या कार्याला विनम्र अभिवादन..!
गणेश जगदाळे/पारनेर
मो. ८००७४२६२७९
COMMENTS