ज्येष्ठ नेते तालुक्यात दोन-तीन वेळा येवून गेले तरी पाणीप्रश्न सुटेना : सुजय विखे पारनेर प्रतिनिधी : देशातील तळागाळातील सर्वसामान्य लोका...
ज्येष्ठ नेते तालुक्यात दोन-तीन वेळा येवून गेले तरी पाणीप्रश्न सुटेना : सुजय विखे
पारनेर प्रतिनिधी :
देशातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत विविध योजना राबवून त्या योजनांचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाल्यानेच पुन्हा २०२४ साली मोदीच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास खासदार सुजय विखे यांनी पारनेर येथील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
पारनेर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, मारूती रेपाळे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, दिनेश बाबर, सचिन वराळ दादाभाऊ वारे, बाळासाहेब पठारे किरण कोकाटे, पंकज कारखिले कैलास कोठावळे, सुभाष गांधी, संदिप मोढवे, डॉ. विनायक सोबले यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विखे यांनी आपल्या भाषणात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. आपले घोटाळे झाकण्यासाठी राज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले असून राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रवक्ते सध्यातरी महाराष्ट्राचे मनोरंजन करत असल्याची टीका खा. विखे यांनी केली. तर स्वतःच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या लपविण्यासाठी राज्यांमध्ये हे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे हे पक्ष संपतील व पुन्हा एकदा राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
चार राज्यात लागलेल्या निकालानंतर
२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये किती आघाड्या होऊ द्या परंतु जिल्ह्यामध्ये समविचारी पक्षांना व घटकांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पन्नास वर्षांपासून आमचे कुटुंब या प्रवृत्तीच्या विरोधात असून यापुढील काळात सुद्धा आमचा लढा कायम राहणार असल्याचे खासदार विखे म्हणाले
काँग्रेस संपलेला पक्ष
चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले असून राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेला घटक पक्ष काँग्रेस हा माझ्या दृष्टीने संपलेला पक्ष असल्याची टीका खासदार विखे • पाटील यांनी केली आहे. तर शिवसेनेने व राष्ट्रवादीने आपली केलेले कार्य जनतेसमोर मांडावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
ज्येष्ठ नेते तालुक्यात दोन-तीन वेळा येवून गेले तरी पाणीप्रश्न सुटेना
पारनेर तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुजला असून देशाची व राज्याचे नेते असणाऱ्यांनी दोन ते तीन वेळा पारनेर तालुक्याचा दौरा केला परंतु ते काही पारनेरचा पाणी प्रश्न सोडवू शकले नाही अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे. तर दुसरीकडे श्री. पवार यांच्यावर टिका करण्याइतका मी मोठा नाही परंतु जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे असा आशावाद यानिमित्ताने मी निश्चित करू शकतो, असे ते म्हणाले.