नगर - महिलांनी सक्षमपणे समाजात प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. अन्याय-अत्याचार निमूटपणे सहन करण्याचा जमाना आता संपुष्टात आला आहे. त्याम...
नगर -
महिलांनी सक्षमपणे समाजात प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. अन्याय-अत्याचार निमूटपणे सहन करण्याचा जमाना आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे आपल्यावरील अन्यायाला महिलांनी न घाबरता वाचा फोडावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा अॅड.अंजली आव्हाड यांनी केले आहे.
आनंदधाम येथील धार्मिक परीक्षा बोर्डा शेजारील ज्ञानांकूर प्री-प्रायमरी स्कुलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे पारितोषिक वितरण अॅड.अंजली आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, देशात आज अनेक उच्च पदावर महिला विराजमान आहेत. त्यामुळे आपण महिला आहोत हा संकुचीत विचार मनात न आणता महिला व युवतींनी कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रात नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करुन आपले करइर घडवावे, असेही त्या म्हणाल्या.
ज्ञानांकूरच्या संचालिका सौ. सुजाता आंधळे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आजच्या युवती व महिलांनी पुढे गेले पाहिजे. आज जरी महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्या तरी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महिलांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे. पुढची चांगली पिढी घडविण्याचे महिलांच्याच हातात आहे. त्यामुळे महिलांनीच महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन ज्ञानांकूर प्रि-प्रायमरी स्कुलने आपले वेगळेपण जपले आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक भाग्यश्री अकसाळ यांनी केले. यावेळी जील सोलंकी, रुपाली निमसे, अनिता मालकर यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.