अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व. सानेगुरुजी लिखित पैगंबर चरित्र इस्लामी संस्कृती या पुस्तकातील पैगंबरांचा अखेरचा उपदेश हा धडा शालेय आणि महाविद्याल...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
स्व. सानेगुरुजी लिखित पैगंबर चरित्र इस्लामी संस्कृती या पुस्तकातील पैगंबरांचा अखेरचा उपदेश हा धडा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याया मागणीचे निवेदन सावित्री-फातेमा विचारमंचच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांना देण्यात आले.
हंगा (ता. पारनेर) येथे खा. पवार सर्वधर्मिय सामुदायिक विवाहसाठी आले असता, समितीचे अध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांनी त्यांना सदर मागणीचे निवेदन व इस्लामी संस्कृती हे पुस्तक दिले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते.
जगाला मानवतेचा संदेश देणारे प्रेषित मोहंमद पैगंबरांचे खरे विचार स्व. सानेगुरुजी यांनी पैगंबर चरित्र इस्लामी संस्कृती या पुस्तकात मांडले आहे. या पुस्तकातील पैगंबरांचा अखेरचा उपदेश विद्यार्थ्यांना शालेय जीवनात वाचण्यास मिळाल्यास समाजात सद्भावना निर्माण होऊन पैगंबरांची खरी ओळख व इस्लामी संस्कृती समजण्यास मदत होणार असल्याचे सावित्री-फातेमा विचारमंचच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पुस्तकाला आचार्य विनोबा भावे व तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. जाकीर हुसेन यांच्या प्रस्तावना आहेत. पैगंबरांचा अखेरचा उपदेश हा धडा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावे व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील वाचनालयामध्ये स्व. सानेगुरुजी लिखित पैगंबर चरित्र इस्लामी संस्कृती हे पुस्तक उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.