मुंबई, दि. 16 : अकोला – अकोट हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याच्या लांबीमध्ये सुधारणा व पु...
मुंबई, दि. 16 :
अकोला – अकोट हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याच्या लांबीमध्ये सुधारणा व पुन:स्थापनेच्या कामाकरिता एम.बी.पाटील या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मुदतीत काम पूर्ण न झाल्याने या कंत्राटदाराचा करारनामा रद्द करण्यात आला असून या कंत्राटदाराची अनामत (परफार्मन्स सिक्युरीटी) रक्कम जप्त करण्याबाबत केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता हे काम 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.
शेगाव-देवरी वरील देवरी फाटा व रौंदळा मधील काम पाटसुळ येथील वन विभागातील 350 मी लांबी व अडसूळ फाटा येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीस खुला असल्याची माहिती त्यांनी दिली. मागील सरकारने राज्यातील टोल बंद केले असल्याने टोलचा खर्च विद्यमान सरकारवर आला आहे. त्यामुळे भविष्यात सर्वच ठिकाणी टोल आकारणी करण्याबाबत शासन निर्णय घेईल, असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.
यासंदर्भात विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, डॉ.रणजीत पाटील, गोपिचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.