मुंबई, दि 16 : हिंगोणा ग्रामपंचायतीअंतर्गत दलित वस्ती निधीचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणात संबंधित ग्रामपंचायत सदस्य, ग्...
मुंबई, दि 16 :
हिंगोणा ग्रामपंचायतीअंतर्गत दलित वस्ती निधीचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणात संबंधित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि कंत्राटदार यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळून आलेल्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
विधानसभेत सदस्य शिरीष चौधरी यांनी जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायत अंतर्गत दलितवस्ती निधीच्या गैरवापरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले. हिंगोणा ग्रामपंचायतीअंतर्गत दलित वस्तीच्या कामासाठी ई-निविदा न काढता दरपत्रकाद्वारे काम ठेकेदारास देण्यात आले होते.
मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी हे दरपत्रक रद्द करून ग्रामसेवकाला नोटीस दिली आहे. कंत्राट रद्द केल्याने शासनाचे पैसे अद्याप खर्च झाले नाहीत. या प्रकरणात संगनमताने दरपत्रक देण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.