रायगड (प्रतिनिधी) : महावितरण आणि रायगड विकास प्राधिकरणच्या वतीने दुर्गराज रायगडावर ११ कि.मी. लांबीच्या भूमिगत विद्युत केबल्स बसविण्याचे ...
रायगड (प्रतिनिधी) :
महावितरण आणि रायगड विकास प्राधिकरणच्या वतीने दुर्गराज रायगडावर ११ कि.मी. लांबीच्या भूमिगत विद्युत केबल्स बसविण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पायरीमार्गासह रायगडावर सर्वत्र प्रकाशव्यवस्था करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तसेच गडावर साकारण्यात येणाऱ्या लाईट अँड साऊंड शो साठी देखील याचा वापर होईल.
याचबरोबर, गडावर आडोशाच्या ठिकाणी चार ट्रान्सफॉर्मर देखील बसवले आहेत. शिवाय विद्युत वाहिन्यादेखील भूमिगत असल्यामुळे याची गडाच्या रांगड्या सौंदर्यावर कोणतीही बाधा येणार नाही. तसेच गडावरील मुसळधार पाऊस पाहता सुरक्षितता व टिकाऊपणाच्या दृष्टीनेही विद्युत केबल्स भूमिगत असणे अधिक सोयीस्कर आहे.
अत्यंत लांब व वजनदार असलेल्या या केबल्स महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड कष्टाने गडावरती पायी ओढून आणलेल्या आहेत. जवळपास वर्षभराहून अधिक काळ चालू असणारे हे काम अनेक अडचणींवर मात करीत यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. लवकरच याचा सुखद परिणाम सर्व शिवभक्तांना पहावयास मिळेल.
याविषयी अधिक बोलताना खासदार छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की,
रायगड विकास प्राधिकरणाचे अधिकारी व विशेषतः महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने एक शिवकार्य म्हणून अत्यंत आत्मीयतेने हे आव्हानात्मक काम पूर्णत्वास नेले, याबद्दल या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!