निघोजच्या मळगंगा यात्रोत्सवास शनिवारपासून सुरूवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन निघोज सरपंच चित्राताई सचिन वराळ यांची माहिती पारनेर प्...
निघोजच्या मळगंगा यात्रोत्सवास शनिवारपासून सुरूवात
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
निघोज सरपंच चित्राताई सचिन वराळ यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील निघोज येथील श्री मळगंगा देवीच्या यात्रेस शनिवार (दि. २३) पासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी राज्यातून पाच ते सहा लाख भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त करण्यात येत आहे.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रूप ग्रामपंचायत, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यात्रेकरू व भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. देवीला हळद लावणे, ८० फूट उंचीची काठी मिरवणूक व मंदिराजवळ उभी करण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनामुळे दोन वर्ष अनेकांवर बंधने आली होती. त्यामुळे नियमानुसार यात्रा संपन्न झाल्याने राज्यातील भाविकांना उपस्थित राहाता आले नाही. यावर्षी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
शनिवारी (दि. २३) देवीला अंबील वर्तवीणे, लंके मंडळाचा नवसाचा बगाडगाडा मिरवणूक, हेमांडपंथी बारवे जवळ बगाड गाडा मिरवणुकीची सांगता, महाप्रसाद असे यात्रेचे स्वरूप आहे. तसेच रात्री नऊ वाजता छविणा पालखीची मिरवणूक यात लेझीम मंडळे, तसेच वाद्ये मंडळे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. मळगंगा देवीच्या सात ठिकाणाच्या पालख्यांचा सहभाग या मिरवणुकीत असल्याने या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी होत असतात. मिरवणुकीची सांगता श्रीराम मंदीराजवळ झाल्यानंतर मळगंगा देवीच्या हेमांडपंथी बारवेमध्ये श्रींचे घागर दर्शन होते. रविवारी (दि. २४) घागर मिरवणूक, घागरीचे विसर्जन होऊन मिरवणूकीची सांगता होणार आहे. सायंकाळी काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सोमवारी (दि. २५) रोजी कुस्त्यांचा जंगी हंगाम्याचे आयोजन करण्यात आले. रात्री ९ वाजता संदल मिरवणूक, रात्री ११ वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २६) देखील कुस्त्यांचे आखाडे भरविण्यात येणार आहे. तसेच बुधवारी (दि. २७) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती निघोज गावच्या सरपंच चित्राताई सचिन वराळ व आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.