पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची त्रेधा पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्याच्या काही भागा...
पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी
अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची त्रेधा
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या काही भागांमध्ये गुरुवारी रात्री दहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला मध्यरात्रीपर्यंत विजेचा कडकडाट होत होता. रात्री अचानक पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांची त्रेधा उडाली या पावसाने शेतकरी वर्गाचे थोडेफार नुकसान झाले. सध्या तालुक्यामध्ये लागवडीचा कांदा काढणी सुरू आहे.
शेतकऱ्याची शेती कामाची लगबग सुरू असून रात्री अचानक वादळी वारा सुटल्याने शेतकऱ्यांना कांदा झाकण्यास संधीच मिळाली नाही तर आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे इतर शेतमालाचे ही मोठे नुकसान झाले आहे टाकळी ढोकेश्वर परिसरातील शेतकऱ्यांची यामुळे मोठी धावपळ उडाली मध्यरात्री वादळ वाऱ्यामुळे वीज गायब झाली होती. विजेच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह टाकळी ढोकेश्वर परिसरांमध्ये पावसाने हजेरी लावली. वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे सध्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील खडकवाडी, वडगाव सावताळ, वनकुटे, पळशी, वासुंदे, पोखरी, कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर, कान्हूर पठार, गोरेगाव, भाळवणी, सुपा, पारनेर या परिसरांमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावत शेतकऱ्यांना सावध केले आहे. जास्त प्रमाणात उष्णता वाढल्यामुळे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.
वातावरणात झालेल्या बदलामुळे मान्सून पूर्व पाऊस हा वादळ वाऱ्यासह होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची आवश्यकता आहे.
तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो, कांदा, मिरची, कोबी अशा पद्धतीची पिके असून वादळी वाऱ्यासह जर पावसाने पुन्हा वारंवार हजेरी लावल्यास शेती पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.