नगरसेवक युवराज पठारेसह तिघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा पारनेर प्रतिनिधी : पारनेर येथील तालीमचालक तथा नगरसेवक युवराज पठारे याच्यासह तिघांविर...
नगरसेवक युवराज पठारेसह तिघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर येथील तालीमचालक तथा नगरसेवक युवराज पठारे याच्यासह तिघांविरुद्ध तालमीतील अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १६) गुन्हा दाखल झाला. आकाश (पूर्ण नाव समजले नाही), विशाल सर (पूर्ण नाव समजले नाही) व युवराज पठारे यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. अधिक माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगा उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने आरोपी युवराज पठारे यांच्या पारनेर येथील तालीमध्ये कुस्ती प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता. १९ मे २०२२ रोजी आरोपी आकाश याने पीडित मुलाशी अश्लिल चाळे केले.
त्या मुलाने दुसऱ्या दिवशी प्रशिक्षण देणारे विशाल सर यांना सांगितले. त्यांनी संबंधित मुलाला विचारणा करण्याऐवजी त्या अल्पवयीन मुलाला झापले आणि हा प्रकार कोणाला सांगून नको, असे सांगितले. त्यानंतर दोन दिवस एका खोलीमध्ये कोंडून ठेवले आणि लोखंडी पाईपने मारहाण केली. मोबाईल हिसकावून घेतला. कोणाला काही न सांगण्याच्या अटीवर मोबाईल दिला. मुलाने वडिलांना फोन करून घडला प्रकार सांगितला. वडिलांनी काही मित्रांबरोबर घेऊन तालिम गाठली. आरडाओरड झाल्याने तालमीतील सर्व मुले बाहेर आली.
त्याचवेळी युवराज पठारे आले आणि त्यांनी पीडित मुलांच्या वडिलांना दमबाजी केली. ७ ते ८ जणांनी वडील व त्यांच्या मित्रांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या मारामारीत वडिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन कोणीतरी काढून घेतली. तालमीतून हाकलून दिले आणि पोलिस ठाण्यात गेलात, तर जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.